मुंबई : रविवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि ते राज्यातील भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर लगेचच ते पक्ष संघटनेच्या कामाला लागले आहेत. अजित पवार गटाच्या नवीन राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन त्यांनी आज केले. तसेच त्यांना राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आता अजित पवारांसोबत मंत्रीपदाची शपथ घेणारे अनिल पाटील यांनी यापुढे आम्हीच व्हिप बजावणार, असे म्हटले आहे.
'सर्वच आमदार अजित पवारांचे नेतृत्व मान्य करत आहेत' : अनिल पाटील म्हणाले की, मला प्रतोद असण्याचा अनुभव आहे. पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष आणि गट नेत्यांच्या आदेशाने व्हिप बजावला जाईल. येणाऱ्या काळात तेच व्हिप लागू होणार आहे. सर्वच आमदार अजित पवारांचे नेतृत्व मान्य करत आहेत. व्हीप कोणी मोडेल असे मला वाटत नाही. आम्हीच राष्ट्रवादी आहोत त्यामुळे बंडखोरी म्हणण्याचा काही प्रश्नच येत नाही, असे अनिल पाटील यावेळी म्हणाले.
नूतन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन : मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. नवीन पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारला. यावेळी आमच्याकडे चाळीस आमदार असल्याचा दावा पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी केला.
बुधवारी दोन्ही गटाची मुंबईत बैठक : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर नवीन प्रतोद आणि नवीन विरोधी पक्षनेते जाहीर करण्यात आले आहेत. अजित पवार यांनी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी तर अनिल पाटील यांची प्रतोद पदी निवड केली आहे. शरद पवार यांनी विरोधी पक्ष नेते पदी जितेंद्र आव्हाड यांची निवड केली आहे. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटाची बैठक मुंबईत होणार आहे. यावेळी दोन्ही ठिकाणी शक्ती प्रदर्शन पाहायला मिळू शकते. त्यानंतरच नेमके आमदार कोणाकडे जास्त आहेत हे स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा :