मुंबई : निवडणूक आयोगाला अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा करणारी याचिका प्राप्त झाली आहे. तसेच आयोगाला जयंत पाटील यांच्याकडून देखील सूचना मिळाली आहे की, त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या 9 आमदारांविरुद्ध अपात्रतेची प्रक्रिया सुरू केली आहे. दुसरीकडे, अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिले आहे.
अजित पवारांच्या बैठकीला 30 आमदार आले : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी आज मुंबईत पक्षाचे पदाधिकारी, आमदार व नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीचे 30 आमदार उपस्थित होते. अजित पवार यांनी मात्र 40 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा केला आहे. सध्या महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादीचे 53 आमदार आहेत. त्यामुळे पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्रता टाळण्यासाठी अजित पवार यांना किमान 36 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.
अजित पवारांचे अनेक गोप्यस्फोट : मुंबईतील बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी अनेक गौप्यस्फोट केल. अजित पवार म्हणाले की, 2014 मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला आम्हाला पाठवले होते. आम्हाला सरकारमध्ये सामिल करायचे नव्हते तर आम्हाला तेथे पाठवलेच का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 2017 मध्ये देखील असाच प्रयत्न झाल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. मात्र तेव्हा भाजपने आम्ही शिवसेनेची साथ सोडणार नाही, अशी भूमिका घेतली होती, असे अजित पवार म्हणाले.
शरद पवारांकडून व्हीप जारी : दुसरीकडे, शरद पवार यांनी देखील आज मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप जारी केला. शरद पवार यांच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार रोहीत पवार, राजेंद्र शिंगणे, प्राजक्त तणपुरे हे उपस्थित आहेत.
हे ही वाचा :