मुंबई - कोरोना संक्रमणाचा विळखा राज्यात पसरत जात असताना याचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्र पोलीस खात्याला पडलेला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 4 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तब्बल 189 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 245 पोलिसांचा मृत्यू झाला असून यात 25 पोलीस अधिकारी आणि 220 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राज्यात कोरोना संक्रमण सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोरोना बाधित पोलिसांचा आकडा हा 22 हजाराच्या पुढे गेला असून तब्बल 22 हजार 818 पोलिसांना आतापर्यंत बाधा झालेली आहे. यात 2 हजार 495 पोलीस अधिकारी तर 20 हजार 323 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात आतापर्यंत 3 हजार 188 कोरोनाबाधित पोलीस उपचार घेत असून यात 385 पोलीस अधिकारी तर 2 हजार 803 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 19 हजार 385 पोलीस उपचार घेऊन बरे झाले, यामध्ये 2085 पोलीस अधिकारी तर 17 हजार 300 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
लॉकडाऊनपासून आतापर्यंत राज्यभरात कलम 188 नुसार 2 लाख 70 हजार 985 गुन्हे दाखल करण्यात आलेले असून पोलिसांवर हल्ला होण्याच्या 364 घटना घडलेल्या आहेत. या संदर्भात 895 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 89 पोलीस जखमी झाले असून वैद्यकीय पथकावर 77 प्रकरणात हल्ला झाल्याचे समोर आले आहे.