मुंबई : राज्यात चौथ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरू आहेत. पण, सध्या लसीकरणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे आणखी लसींच्या डोसची महाराष्ट्राला गरज आहे. यासंबंधीची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेत दिली. आपल्या राज्याला केवळ साडेसात लाख लसीचे डोस दिले आहेत. मध्यप्रदेश, हरियाणा, उत्तरप्रदेश यांना जास्त डोस वाटप झाले आहेत. मी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना बोललो आहे. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील बोलले आहेत. महाराष्ट्रात रुग्णसंख्या जास्त असताना महाराष्ट्राला लस कमी का? असा प्रश्न आम्ही त्यांना केला. यावर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे की, लस वाढवून देण्यात येईल.
दर आठवड्याला 40 लाख डोसची गरज
याबाबत आम्ही पत्र व्यवहार करत आहोत. आम्हाला आठवड्याला 40 लाख डोस लागणार आहेत. सातारा, सांगली, पनवेल येथे लोकांना लस मिळत नाही. हर्षवर्धन हे सकारात्मक उत्तर देत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व सरकार आणि प्रशासन काम करत आहे. यासाठी आम्ही एकमेकांशी समनव्य साधत आहोत. बाहेरच्या देशाला लस देण्यापेक्षा देशातील लोकांना आज जास्त गरज आहे. अमेरिकेपासून अनेक विकसित देशाने 18 वर्षावरील सर्वाना लस सुरू केली आहे. हा गट बाहेर पडणारा आहे. त्यामुळे या वर्गाला लस देणे गरजेचे आहे, असे टोपे यावेळी म्हणाले.
जनतेचा रोष ओढून निर्बंध लादले
आम्ही हाफकीनला डोस तयार करण्याची मागणी केली. गुजरातला रुग्णसंख्या कमी असताना डोस जास्त दिले गेले आहेत. तुलना करताना दर दशलक्ष अशी तुलना करतो. तर दर दशलक्ष महाराष्ट्र मोठे राज्य आहे. त्यामुळे दर दशलक्ष या मानका प्रमाणे राज्याची मोजणी झाली पाहिजे. WHO पासून वॉशिंग्टनने आपल्या राज्याचे कौतुक केले जात आहे. राज्यात खरी आकडेवारी समोर आणत आहोत. RTPCR टेस्ट आम्ही नियमन करतो आहोत. उत्तर प्रदेशमध्ये फक्त 10 टक्के अँटीजन टेस्ट केल्या जात आहेत. आम्ही टेस्टिंग किट क्वॉलिटीच्या वापरत आहोत. राज्याचा परफॉर्मन्स ठीक नाही, असं सांगण्यात येतेय. मात्र, राज्यसरकार चांगलं काम करत आहे. आम्ही जनतेचा रोष ओढून निर्बंध लादले आहेत, असे टोपेंनी म्हटले.
रेमडेसिवीरचे ब्लॅक मार्केटींग
आज रेमडेसिवीर इंजेक्शन सप्लायर आणि उत्पादक यांच्यासोबत बैठक घेणार आहे. दोन मागण्या आहेत. एक गरजे प्रमाणे पुरवठा करा आणि दुसरी या इंजेक्शनाची जास्तीत जास्त बाराशे रुपये किंमत ठेवा, याबाबत यावेळी चर्चा केली जाणार आहे. सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी राज्यात मोठ्या प्रमाणात आहे. अनेक ठिकाणी या औषधाची मनमानी किंमत घेतली जाते. तसेच या औषधाचा काळा बाजारही मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे या औषधाचा काळाबाजार होऊ नये यासाठी योग्य ती पावले उचलली जातील. हे नफेखोरीचे दिवस नाहीत, असे आज त्यांना सांगणार आहे, असे राजेश टोपेंनी म्हटले.
...तर ऑक्सिजन कमी पडणार
मुंबई आणि महाराष्ट्राची इतर राज्याशी तुलना होऊ शकत नाही. दोन गुजरात म्हणजे एक महाराष्ट्र. इकॉनॉमिकल हब असल्याने खूप लोक महाराष्ट्रात येत असतात. पण, केंद्राने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार आम्ही वागत आहोत. केंद्र सरकार आणि राज्यसरकारने हातात हात घालून काम केले पाहिजे. ऑक्सिजन निर्माण करतोय तेवढे पुरतंय. पण, अशी परिस्थिती राहिली तर ऑक्सिजन कमी पडणार आहे. त्यामुळे आम्ही इतर राज्यातून मागणी करत आहोत, असे टोपेंनी म्हटले.
...तर लसीकरण मोहीम बंद पडेल
राज्याकडे केवळ आता नऊ हजार लसीचे डोस शिल्लक आहेत. त्याचे वितरण करण्यात आले आहे. हा लसीचा साठा केवळ दीड दिवस पुरेल एवढाच आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रं बंद पडली आहेत. राज्यात 4 हजार लसीकरण केंद्रं आहेत. त्यातील सातारा, सांगली आणि पनवेल इथे जवळपास 26 लसीकरण केंद्रं बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. केंद्राने राज्याला आणखी 17 लाख डोस पुरवणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र, हा पुरवठा 15 ते 20 एप्रिलसाठी येणार आहे. त्यामुळे उद्या जर लस संपली, तर राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण बंद करावं लागेल, अशी भीती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.
पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री करणार चर्चा
आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व राज्यातील मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री पंतप्रधानांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेदरम्यान राज्यामध्ये कमी असलेल्या लसीच्या साठ्याबाबत मोदींशी चर्चा केली जाईल. लवकरात लवकर लसीचा साठा महाराष्ट्रासाठी पाठवण्यात यावा, अशी विनंती देखील करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच वेळोवेळी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्यासोबत लसींच्या साठ्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडून देखील राज्याला लवकरात लवकर साठा उपलब्ध करून दिला जाईल, अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आलेले आहे. राज्याला दर आठवड्याला 40 लाख लसीचे डोस मिळाले पाहिजेत, अशा प्रकारची मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली असल्याचे टोपेंनी सांगितले.
केंद्राची 30 आरोग्य पथकं येणार राज्यात
केंद्राकडून 30 आरोग्य पथकं राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या पथकाकडून 30 जिल्ह्यामधील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्यामध्ये लसीकरणाची मोहीम कशाप्रकारे राबविण्यात येते आहे? कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यावर आळा बसवण्यासाठी केलेल्या उपाय योजना याबद्दल माहिती घेतली जाणार आहे. केंद्राने दिलेल्या गाईड लाईन्स राज्यसरकार पाळत आहे का नाही? याची देखील पाहणी केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
कुठेही धार्मिक आणि राजकीय सभा घेऊ नये
निवडणूक सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखा लोकप्रिय नेता आल्याने लोक जमली असतील. पण अजित पवार लोक जमावतील असं नाही. पण निवडणूक असल्याने कधी लोक जमत असतात त्यांना आवरणं कधी अवघड जातं. मात्र, कुठेही धार्मिक आणि राजकीय सभा घेऊ नये, असेही टोपेंनी म्हटले.
हेही वाचा - शेतकऱ्यांची चिंता वाढणार; विदर्भात अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज
हेही वाचा - मास्क नव्हे तर भारतीय संस्कृतीच खरे 'कोरोना कवच'; उशा ठाकूर यांचे दिव्यज्ञान!