मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात अनधिकृत दर्ग्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये मनसैनिकांकडून ही मोहीम राबवली जात आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इस्लाम धर्मातील दर्ग्यांविषयी मोठा दावा केला आहे.
इस्लाममध्ये दर्ग्याला मान्यता नाही : इस्लाम धर्मामध्ये दर्ग्याला मान्यताच नाही. जे मुस्लिम बांधव दर्ग्याला मानतात त्यांना सच्चे मुसलमान म्हणता येणार नाही, असे स्वतः अनेक मुस्लिम बांधव सांगत आहेत. असे जर असेल तर दर्ग्याच्या समर्थनासाठी उभे राहणारे आणि मनसेच्या आंदोलनाला विरोध करणारे मुस्लिम हे सच्चे मुस्लिम नाहीत, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी केला आहे.
दर्ग्यासाठी संशयास्पद जागाच का : मनसे प्रवक्ते योगेश चिले यासंदर्भात बोलताना म्हणाले की, दर्ग्यांसाठी निवडली जाणारी जागा ही एकांतातीलच जागा का निवडली जाते. दर्ग्यासाठी डोंगरावरील जागा असेल समुद्रकिनाऱ्यावरील जागा असेल किंवा कुठेतरी एकांतातील जागाच का निवडली जाते? अशा जागांवरती काही गैरकृत्य करण्याचा मानस असतो का हे सुद्धा तपासून पाहिले पाहिजे. त्यामुळे अशा संशयास्पद जागा निवडून त्यावर अनधिकृतपणे जर दर्गे उभारले जात असतील तर त्याला मनसेकडून विरोधच केला जाईल. अशा अनधिकृत दर्ग्यांना समर्थन सच्चा मुसलमानांनी करू नये, असे आवाहनही चिले यांनी यावेळी केले.
पनवेल येथील दर्ग्याविरोधात आंदोलन : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पनवेल येथील दर्ग्याविरोधात तीव्र आंदोलन केले आहे. त्याचप्रमाणे या रायगड जिल्ह्यातील अनेक अनधिकृत दर्ग्यांविरोधात आंदोलन करणार असल्याचेही योगेश चिले यांनी सांगितले.
माहिममधील दर्ग्यावरून मुद्दा उपस्थित : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या भाषणामध्ये माहीम येथील मगदूम बाबा दर्गाच्या पाठीमागे समुद्रात होत असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळाचा मुद्दा उपस्थित केला होता. ते अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी राज्य सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला गेला होता. परंतु, शासनाने यावर तातडीने कारवाई करत २४ तासांच्या आत हे अनधिकृत बांधकाम भुईसपाट केले होते. दरम्यान, आम्ही लहानपणापासून ही मजार बघत आलो आहोत. इथे नेहमी अनेक भाविक येतात आणि प्रसाद अर्पण करत असतात. इथे कुठलाही भेदभाव नाही पण अचानक कोणालातरी जाग येते आणि याविषयी सांगितले जाते, हे फार हे खेदजनक असल्याची मुस्लिम बांधवांनी प्रतिक्रिया दिली होती.
हेही वाचा : Mahim Dargah Action : 'राज ठाकरे यांनी दुसरे हाजी अली बांधावे, त्यांचे स्वागत आहे'