मुंबई - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन कामकाजाचे ७ दिवस लोटले. अशात राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने ते विविध आयुधांमार्फत आमदारांकडून सभागृहात उपस्थित केले जातात. अशात प्रश्नोत्तरे, लक्षवेधी, विविध प्रस्ताव व औचिताच्या मुद्द्यांद्वारे हे प्रश्न उपस्थित केले जातात. परंतु अधिवेशनाचा कालावधी कमी व कामकाज जास्त असल्याने अनेकदा आमदारांना या प्रश्नावर बोलता येत नाही. किंबहुना त्यांना बोलू दिले जात नाही. याचाच प्रत्यय आज सभागृहात आला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना जास्त बोलण्यास सभापती नीलम गोऱ्हे यांनी मनाई केल्याने या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
सभागृह कशाला चालवता? - चक्क विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यालाच सभापतींनी बोलण्यास मज्जाव केल्याने अंबादास दानवे प्रचंड संतापले. यावर बोलताना त्यांनी, एका प्रश्नसाठी तुम्ही इतरांना पाऊण तास देता, परंतु मला वेळ का दिला जात नाही? मला वेळ मिळू नये असे तुम्हाला वाटत आहे का? असे सांगत सभापतींना उपप्रश्न केला. त्यावरुन दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. विरोधी पक्षनेत्यालाच जर सभागृहात बोलू द्यायचे नसेल तर सभागृह कशाला चालवायचे? असा प्रश्न ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला. यावर विरोधकांनीसुद्धा सहमती दर्शवली.
नक्की होतेय काय? - सभापती नीलम गोऱ्हे या त्यांची रोखठोक भूमिका व कडक शिस्त यासाठी प्रचलित आहेत. अशात पक्षांतराच्या मुद्द्यावर त्यांच्यावरच कारवाई करत त्यांचे निलंबन करण्याची मागणी विरोधकांनी लाऊन धरली होती. पण त्यांना अभय भेटले. अशात जास्तीत जास्त कामकाज सभागृहात व्हावे हा त्यांचा मानस आहे. पण पावसाळी अधिवेशन सुरू असताना राज्यात होणारी अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, मंत्र्यांचे दौरे या कारणास्तव सभागृहातील कामकाजाचा आवाका ही वाढला आहे. अशाही परिस्थितीत सर्वात जास्त कामकाज होऊन सर्व प्रश्नांना न्याय भेटावा ही त्यांची इच्छा आहे. परंतु फक्त जास्तीत जास्त कामकाज व्हावे या हेतूने कामकाज लोटून नेता कामा नये ही विरोधी नेत्यांची भूमिका. या कारणाने हे वाद उद्भवत आहेत. अशात कामकाजाच्या एका दिवसात प्रश्नोत्तरे, ४ महत्त्वाचे प्रस्ताव, १२ लक्षवेधी व २३ विभागांच्या पुरवण्या मागण्यांवर चर्चा हे कसे साध्य होऊ शकते. हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.
हेही वाचा -