मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात माजी खासदार तथा भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओचे प्रकरण चांगलेच गाजले. विरोधी पक्ष आज सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून घेरण्याची शक्यता आहे.
किरीट सोमैय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओवरून विधानसभेसह विधानपरिषदेत मोठा गदारोळ झाला. ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट पेनड्राईव्ह आणत चौकशी करत सोमैय्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल आणि वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Live Updates-
- काल देशप्रेमींची बंगळुरूत बैठक झाली आहे. आमची लढाई हुकूमशाहीविरोधात आहे, असे उद्धव ठाकरे यांनी विधानभवनातून माध्यमांशी बोलताना सांगितले. ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.
- आमदार अबू आझमी यांनी लक्षवेधी दरम्यान औरंगाबादमधील घटनेचा उल्लेख केला. मी अल्लाहला मानतो असे सांगणाऱ्या व्यक्तीला औरंगाबादमध्ये मारहाण करण्यात आली. देश मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, असे म्हणण्यात आले. हे योग्य नाही. यावर भाजपचे सर्व आमदार आक्रमक झाले. सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले आहे.
- मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी राज्य सरकार कमी पडल्याचा आरोप होतो. त्याबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. न्यायालयात बाजू मांडण्यासाठी सरकारकडून ज्येष्ठ विधीतज्ज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे.
- राज्यात सध्या विरोधी बाकाला दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधी बाकावरील आमदारांना निधी दिला जात नाही. रोजगार हमीच्या कामातील निधीही केवळ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मिळतो. विरोधी बाकावरचे आमदार महाराष्ट्राचे नाहीत का, असा संतप्त सवाल काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी सभागृहात विचारला प्रश्नोत्तराच्या दरम्यान त्या बोलत होत्या.
- सभागृहात बोलू दिले जात नाहीत असा भास्कर जाधव यांनी आरोप केला. माझ्या लक्ष्यवेधी लावल्या जात नाहीत, असा भास्कर जाधव यांनी आरोप केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केक खाऊ घालत नसल्याने तसे घडत असल्याची मिश्किल टिप्पणी केली आहे.
- शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी सभात्याग केला आहे. बोगस बियाणांबात याच अधिवेशनात कायदा होणार असल्याचे आश्वासन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे.
- केंद्र सरकारने खताचे भाव वाढविले नाहीत, असे स्पष्टीकरण कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. मात्र, बोगस बियाणांवरून विरोधकांचे समाधान झाले नाही. नाना पटोले, विजय वडेट्टीवारदेखील आक्रमक झाले आहेत. खतांमध्ये केंद्र सरकारकडून नफेखोरी करत असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
- महिलांना संरक्षण न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो... राज्यात जनताचे झाले हाल, सरकार झाले मालामाल... खोक्यावर खोके, एकदम ओके, अशी विरोधकांनी घोषणाबाजी केली आहे. त्यामुळे विरोधक आजही किरीट सोमैय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओवरून पुन्हा सभागृहात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे चित्र आहे.
- विरोधकांनी सलग तिसऱ्या दिवशी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधकांनी पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
विधिमंडळाच्या दुसऱ्या दिवशी काय घडले?
- मुंबईतील सर्व रुग्णालयांना फायर सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश दिल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. काही रुग्णालयांनी यापूर्वीच फायर ऑडिट पूर्ण केले आहे. उर्वरित रुग्णालयांना ९० दिवसांत ऑडिट पूर्ण करण्यास सांगितल्याचे सामंत यांनी सांगितले.
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडून आलेल्या सदस्यांना निवडणुकीच्या एका वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्रे सादर करण्याची परवानगी देणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंगळवारी मंजूर केले. त्यामुळे राज्यभरातील सुमारे 7,000 निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना फायदा होणार आहे.
- विधान परिषद आमदार आणि ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर हे भाजपमध्ये भविष्यात येमार असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. हा विनोद नसल्याचेही त्यांनी म्हटले.
- महाराष्ट्र सरकारने केंद्राला एनडीपीएस कायद्यात बदल करण्याची विनंती केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, सध्याचा एनडीपीएस (नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस) कायदा 1985 खूप जुना असून बदलत्या काळानुसार त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे.
- शिवसेनेचे (यूबीटी) नेते अनिल परब यांनी नीलम गोऱ्हे या उपसभापती पदावरून काम करू शकत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर फडणवीस म्हणाले की, गोऱ्हे यांनी कोणत्याही नवीन पक्षात प्रवेश केलेला नाही. त्या शिवसेनेच्या तिकिटावर आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडणून आल्या आहेत. खरी शिवसेना ही शिंदे यांची शिवसेना आहे.
हेही वाचा-
- kirit somaiya viral video : राज्यात किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओनंतर संतापाची लाट; पहा व्हिडिओ
- Kirit Somaiya Viral Video : किरीट सोमय्या कथित व्हिडिओ प्रकरण; महिला आयोगाने घेतली दखल
- Sudhir Mungantiwar On Kirit Somaiya : संधी आहे, संधीचे सोन करा!; किरीट सोमैया प्रकरणी मुनगंटीवार यांचा अनिल परब यांना सल्ला