मुंबई - महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याच मुद्यावर येत्या 27 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सीमा कक्षाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक पवार यांनी "महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद-संघर्ष आणि लढा" हे पुस्तक लिहिले असून या पुस्तकाचे प्रकाशन 27 जानेवारीला सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगावमधील पदाधिकारी देखील उपास्थित असणार आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहराज्य मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, खासदार अरविंद सावंत, विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर उपस्थित राहणार आहेत.
बेळगाव, कारवार हा भाग महाराष्ट्रात सामील करावा, ही गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य पुन्हा एकदा या प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. ही चर्चा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेत्यांशी केली जाणार आल्याची माहिती मिळत आहे.