मुंबई: महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या सर्वाधिक 891 गुन्ह्यांची नोंद आहे. तर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे तेथे 424 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार तामिळनाडू (418), कर्नाटक (379), ओडिसा (353) गुन्ह्याची नोंद झाली आहे. सर्वात कमी भ्रष्टाचार असलेल्या राज्यांमध्ये सिक्कीम (०), नागालॅंड (1),मिझोरम (2), मेघालय (2), मणिपूर (6), गोवा (9) राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र्रातील गुन्ह्यांची संख्या इतर राज्याच्या तुलनेत दुप्पट आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) 2020 च्या गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र पाठोपाठ तामिळनाडू, केरळ, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे दाखल झालेत. देशातील 29 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये ही तुलना करण्यात आली आहे. याशिवाय गंभीर गुन्ह्यांत राज्य तिस-या क्रमांकावर आहे. राज्यात 2020 मध्ये 2142 हत्येचे गुन्हे दाखल झाले होते. याबाबत उत्तर प्रदेश व बिहारमध्ये सर्वाधीक हत्या 2019 मध्ये झाल्या आहेत. उत्तरप्रदेश व बिहारमध्ये 2019 मध्ये 3806 आणि 3138 हत्यांचे गुन्हे दाखल आहेत.
सात महिन्यात 469 ठिकाणी सापळे
महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी गेल्या सात महिन्यात तब्बल 469 ठिकाणी सापळे रचले. यातून 648 आरोपींना लाचलुचत विभागाने बेड्या ठोकल्या. एसबीने मार्च महिन्यात सर्वाधिक सापळे रचत 119 भ्रष्ट अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यापाठोपाठ जून महिन्यात 77 ठिकाणी सापळे रचण्यात आले होते. त्यातून 103 जण रंगेहात पकडले गेले होते. तर जुलैमध्ये 71 सापळ्यांमधून 100 आरोपी रंगेहात पकडण्यात आले होते. जानेवारी ते ऑगस्ट या काळात 359 सापळे रचले होते. त्यातून 501 आरोपी एसीबीच्या जाळ्यात अडकले. फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक 72 सापळे रचण्यात आले होते. त्यातून 96 आरोपी पकडण्यात आले होते. पण जानेवारी महिन्यात 68 सापळ्यांमधून 96 आरोपींना पकडण्यात आले होते.