मुंबई - राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. गावा-गावात या निकालांची उत्सुकता शिगेला पोहचली असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
राज्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घोषित झाल्या आहेत. त्यापैकी राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात 22 जानेवारी रोजी; तर अन्य सर्व जिल्ह्यांत 18 जानेवारी रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. निवडणुकीचे धुमशान गावा-गावात दिसून आले होते. अनेक ठिकाणी चुरशीने लढत झाली आहे, तर काही ग्रामपंचायतींनी त्यांचा बिनविरोध राहण्याचा विक्रम अबाधित ठेवला. काही ग्रामपंचायतींनी तब्बल 50 ते 60 वर्षे बिनविरोध राहण्याचा पराक्रम केला आहे.
राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायत निवडणुका?
ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. अशाप्रकारे राज्यात एकूण 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले.
निवडणुकीची आकडेवारी -
• निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234
• प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711
• एकूण प्रभाग- 46,921
• एकूण जागा- 1,25,709
• प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
• अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
• वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
• मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
• बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718
• अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880