मुंबई - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. यादरम्यान राज्य सरकारने केशरी रेशन कार्ड धारकांना आठ रुपये प्रति किलो दराने तीन किलो गहू आणि 12 रुपये प्रति किलो दराने दोन किलो तांदूळ यांचे वितरण सुरू केले आहे. मे आणि जून महिन्यांसाठी हे धान्य वितरित करण्याचा निर्णय झाला आहे. राज्यात जवळपास तीन कोटी केशरी रेशन कार्ड धारक आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मे आणि जून महिन्यात राज्यातील सर्व केशरी रेशन कार्ड धारकांना सवलतीच्या दरात गहू आणि तांदूळ उपलब्ध करून दिले जातील. केशरी रेशन कार्ड धारक दारिद्र्यरेषेच्या वर आहेत या नागरिकांसाठी राज्य सरकारने 4.5 लाख मेट्रिक टन धान्य राज्यभरातील सरकारी रास्त धान्य दुकानांमध्ये वितरित केले आहे.