मुंबई - मिशन बिगिन अंतर्गत राज्य सरकारने उद्यापासून (गुरूवार) मुंबईतील मेट्रो, विविध प्रकारचे उद्याने, करमणुकीची केंद्रे, सार्वजनिक ठिकाणांसोबत राज्यात असलेली सरकारी आणि खाजगी ग्रंथालय सुरू करण्यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. यासोबतच राज्यात असलेल्या प्रतिबंधित क्षेत्राबाहेरीलआर्थिक व्यवहाराची प्रदर्शने, ग्रामीण भागात भरण्यात येणारी आठवडी बाजार, यासोबतच जनावरांचे बाजार यांना सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. यामुळे मागील सहा महिन्यापासून बंद असलेले आठवडी बाजार आणि जनावरांचा बाजार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहेत.
यासाठी संबंधित विभागाकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात येणार आहेत. सरकारने आज जारी केलेल्या अधिसूचनेत राज्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन त्यासाठीची नियमावली सुद्धा जाहीर केली आहे. त्यांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे अधिसूचनेत म्हटले आहे. मात्र, राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून मागील अनेक दिवसांपासून लावून धरण्यात आलेल्या मंदिर उघडण्याच्या मागणीला मात्र कुठेही थारा देण्यात आला नाही.
प्रतिबंधित क्षेत्रात असलेले उद्योग व्यवसाय बंद ठेवणार आहेत. तर शाळा महाविद्यालय तसेच शैक्षणिक संस्था सुद्धा 31 ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील.