मुंबई - महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल हे नाराज असून त्यांनी केंद्रात परत जाण्यासाठी राज्य सरकारला विनंती केली असल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार त्यांना पुन्हा एकदा केंद्रात पाठवले जाण्याची शक्यता आहे.
सुबोध कुमार जायस्वाल का आहेत नाराज?
यावर्षी सप्टेंबर महिन्यात राज्यातील 50 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, या बदल्या करताना महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांचा सल्ला किंवा त्यांचे मत विचारात घेतले गेले नाही, यामुळे ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे.
राज्य सरकारकडून हिरवा कंदील -
नाराज असलेले पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल यांनी राज्य सरकारकडे त्यांना केंद्रामध्ये पुन्हा पाठवण्यात यावे, यासाठी विनंती केली असल्याचे समोर येत आहे. राज्य सरकारने सुबोध कुमार जायस्वाल यांच्या विनंतीचा विचार करत पुन्हा केंद्रात पाठवण्याचा निर्णय घेतला असून केंद्रातील एनएसजीच्या (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) महासंचालकपदी त्यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
कोण आहेत सुबोध कुमार जयस्वाल?
1985 च्या बॅचचे असलेले सुबोध कुमार जयस्वाल यांनी बीए ऑनर्स, एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच 2009 मध्ये त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देण्यात आले होते. सुरुवातीला त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तपद भूषवले; नंतर त्यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. भारताचा गुप्तहेर विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॉमध्ये त्यांनी 9 वर्ष काम केले आहे. या 9 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी ॲडिशनल सेक्रेटरी म्हणून तीन वर्षं रॉला सेवा दिली आहे. यासंदर्भात सुबोध जायस्वाल यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र ते शक्य होऊ शकले नाही.