मुंबई - ममता बॅनर्जी या 'बंगाली' जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळविला. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाल जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांनाही पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा मोठ्या प्रमाणात प्रचार सुरु होता. यात महाराष्ट्रात सर्वाधीक कोरोना रुग्ण आढळत असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान कार्यालयात अनेकवेळा फोन केले. मात्र, त्यावेळी त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अशी चर्चा याआधी सुरु होती. त्यावरुनच मुख्यमंत्र्यांनी आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया, असा टोला भाजपाला लगावला आहे.
हेही वाचा -देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; 5 जणांवर गुन्हा दाखल