मुंबई: राज्यातील कांदा, कापूस, द्राक्ष आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे भीषण वास्तव विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २८९ प्रस्तावाद्वारे मांडले. राज्यात कांदा उत्पादक, कापूस आणि द्राक्षाची परिस्थिती भयानक आहे. राज्य सरकारकडून मदत दिली जात नाही. राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकऱ्याला केवळ दोन रुपयाचा चेक दिला आहे. ज्याने 514 किलो कांदा विकला आहे, ही गंभीर बाब असल्याचे दानवे म्हणाले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा: देशात सर्वाधिक कांदा निर्यात करणारा भारत देश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा उत्पादन केले जाते. शेतकऱ्यांवर नांगर फिरवला आहे. कांद्याबरोबरच कापसाची स्थिती भयानक आहे. कापसाला एकेकाळी १४ हजार रुपये भाव दिला गेला होता. मात्र हे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. पिकांवरील रोगराईचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. राज्य सरकार काही हमीभाव देणार आहे की नाही, असा सवाल दानवे यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. रविकांत तुपकर यांना जेलमध्ये टाकण्यात आले. कांदा, कापूस, हरभरा याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचा आरोप दानवे यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होण्याची मागणी देखील त्यांनी केली.
सभागृहात विरोधकांनी घोषणाबाजी: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधकांच्या प्रश्नाला उत्तरे दिली. शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे हे तथ्य आहे. महाराष्ट्रसह राजस्थान पंजाब आणि मध्य प्रदेश या इतर तीन राज्यात कांदा उत्पादन होतो आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात होतो आहे. तसेच, परदेशात फॉरेन करन्सी नसल्याने निर्यात करू देत नाही. देशातले मार्केट आणि परदेशातील मार्केट अडचणीत असल्यामुळे याचा परिणाम होतो आहे. तरीही सर्व प्रकारचा कांदा नाफेडने खरेदी करायचा निर्णय घेतला आहे. सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आहेत. नाफेड बरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने करार केला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली जाईल असे ग्वाही फडणवीस यांनी दिली. या उत्तराने विरोधकांचे समाधान न झाल्याने त्यांनी राज्य सरकारला धारेवर झाले. फडणवीस सभागृहाची दिशाभूल करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर, विरोधकांना शेतकऱ्यांच्या कळवळा नाही, असा, ठपका देवेंद्र फडणवीस यांनी ठेवला. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले. सभापती नीलम गोरे यांनी सुरुवातीला पंधरा मिनिटांनी नंतर 25 मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले.
विधान परिषदेमध्ये कोण कोण काय म्हणाले :
- २ लाख क्विंटल कांद्याची नाफेडमार्फत खरेदी सुरु.. चुकीचं असेल तर हक्कभंग आणा : देवेंद्र फडणवीस
- कांदा निर्यातीवर बंदी नाही : मुख्यमंत्री शिंदे
- विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी
- कांद्याच्या प्रश्नावरून विधानसभेत गदारोळ
- कांदा उत्पादक शेकऱ्यांसाठी सरकारने त्वरित उपाययोजना करावी: विधानसभा अध्यक्षांचे निर्देश
- अमरावतीत हरभरा उत्पादक शेकऱ्यांवर लाठीचार्ज झाला: नाना पटोल
- सरकारने कांद्याची खरेदी करावी : अजित पवारांची विधानसभेत मागणी