मुंबई - काही वेळा पूर्वीच नाथा भाऊंचा राजीनामा माझ्याकडे पोहचला आहे. कितीही रागवले तरी नाथाभाऊ हे पाऊल उचलतील असे वाटले नव्हते. पण, काही ठरलेल्या गोष्टी असतात त्या टाळू शकत नाही. त्यांनी पक्षात राहावे नेतृत्व करावे, असे आमची इच्छा होती मात्र असे होऊ शकले नाही. त्यांनी तिकडे जाऊन चांगले काम करावे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
मी त्यांना वारंवार सांगत होतो की, एकत्र बसून या विषयावर पडदा पाडू, फडणवीस यांच्याशी आपण बोलू. पण, याबाबत काही झाले नाही. माझा आणि त्यांचा चांगल्याप्रकारे संवाद असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करत होतो, एकत्र बसू असे वारंवार म्हणत होतो. चर्चा होऊन मार्ग काढण्याचे प्रयत्न करत होतो. मात्र, शेवटी नाईलाज झाला काही प्रयत्न असतात ते अपयशी होतात, असेच याबाबतीत झाले असल्याचे पाटील म्हणाले.
हेही वाचा - एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास...
तुटेपर्यंत ताणल गेले नाही, आपण नेहमीच प्रयत्न केले, संवाद साधण्याचा प्रयत्न झाला. मी संवाद साधला म्हणजे पक्षाच्या सर्वांनीच संवाद साधला असेच आहे. भाजपमध्ये पक्षश्रेष्ठींनी संवाद साधला की सगळ्यांनी संवाद साधणे गरजेचे नसते. त्यांच्यावर अन्याय झाला असल्याचे सांगितले जाते, त्याविषयी त्यांनाच विचारावे लागेल, राजीनाम्याचे कारण तेच सांगतील असे पाटील म्हणाले.