मुंबई : महाविकास आघाडीची आज मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे वज्रमुठ सभा होणार आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाविकास आघाडीने राज्यात आतापर्यंत तीन सभा घेतल्या आहेत. या सभांना मिळालेला प्रतिसाद आणि त्या त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद आणि त्याचे मतात होणारे परिवर्तन हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
महाविकास आघाडी एकत्र असल्याचा संदेश पोहचला नाही : राज्यात महाविकास आघाडीच्या वतीने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी वज्रमुठ सभा आयोजित करण्यात येत आहेत. या सभांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. औरंगाबाद येथे झालेल्या वज्रमुठ सभेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे महाविकास आघाडी राज्यात वातावरण तयार करेल असे चित्र होते. तत्पूर्वी शिवसेनेच्या खेडमध्ये झालेल्या सभेलाही चांगला प्रतिसाद मिळाल होता. या सभांमधून महाविकास आघाडी एकत्र असल्याचा संदेश जनतेपर्यंत काही अंशी पोहोचत आहे. मात्र नागपूर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेनंतर काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळाले. नागपूर इथल्या सभेत काँग्रेसच्या नेत्यांची भाषणे झाल्यानंतर कार्यकर्ते उठून जाताना दिसले. ज्या भागांमध्ये ज्या पक्षाचे प्राबल्य आहे त्या ठिकाणी असेच चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी महाविकास आघाडी एकसंध आहे हा संदेश जनतेपर्यंत अद्यापही पुरेसा पोहोचलेला नाही, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केले आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत एकत्र असल्याचे स्पष्टपणे दाखवावे : शिवसेनेने जळगाव येथे घेतलेल्या सभेला फारशी गर्दी झाली नाही. मात्र आता मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या आजच्या वज्रमूठ सभेला गर्दी जमवण्याचा या पक्षांचा प्रयत्न आहे. त्यातही शिवसेना मुंबई परिसरात प्रभावी असल्याने ती सभेला जास्तीत जास्त कार्यकर्ते आणण्याचा प्रयत्न करेन. परंतु आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करता काँग्रेसने वेगळी चूल मांडली तर वज्रमूठ सभांमधून दिला जाणारा संदेश जनतेपर्यंत विस्कळीत रित्या पोहोचेल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपण महाविकास आघाडी एकत्र आहोत आणि शिवसेने सोबत आहोत हे अधिक स्पष्टपणे दाखवायला हवे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. तसे झाले तरच हा संदेश पोहोचेल आणि आगामी निवडणुकांमध्येच याचा परिणाम दिसेल, असेही जोशी यांनी म्हटले आहे.
सभांचा अद्याप दृश्य परिणाम नाही : राज्यातील वज्रमुठ सभांचा कुठलाही दृश्य परिणाम अद्याप दिसला नाही. मुळात महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे एकसंधपणे जनतेसमोर जात असले तरी राजकीय नेत्यांकडून वेळोवेळी केली जाणारी वेगळी वक्तव्य यामुळे जनतेच्या मनात संभ्रमाचे वातावरण अद्यापही आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने जो संदेश जनतेपर्यंत पोहोचवायला हवा तो अद्याप पोहोचलेला नाही, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषण दिलीप सपाटे यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा : Vajra Muth rally : वज्रमुठ सभेची महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी, अजित पवारांच्या भाषणाबाबत संभ्रम कायम