मुंबई : बाजार समित्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खूप महत्वाच्या असतात. त्यांच्यासाठी आपला भाजीपाला असो की शेतीमाल विकण्यासाठी हक्काची बाजारपेठ असते. राजकीय नेत्यांना थेट शेतकऱ्यांच्या मताच्या दृष्टीने या बाजार समित्या महत्वाचे काम करत असतात. याच कारणांमुळे सगळेच राजकीय पक्ष बाजार समित्यावर आपल्या पक्षाचा झेंडा, वर्चस्व मिळवण्यासाठी इच्छुक असतात. त्याचाच भाग म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यातील सर्व निकाल येणे बाकी आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार महिविकास आघाडीने बाजी मारली आहे. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल आले असून प्रस्तापित भाजप आणि शिवसेनाच्या सत्तेला सुरुंग लागला आहे.
आजचा निकाल लोकसभा विधानसभेची नांदी- राज्यातील बाजार समित्यांचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अनेक बाजार समितीवर आपले वर्चस्व निर्माण केले. राज्यात जरी भाजप सेनेचे सरकार असले तरी मतदारांनी काँग्रेसकडे आपले झुकतमाप दिले आहे. या निकालावरून हेच लक्षात येते की जनता आता काँग्रेच्या पाठीमागे उभी राहू लागली आहे. विदर्भातील भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस उमेदवार निवडून येतो. पुण्यात देखील भाजपाच्या गडात सत्ता हस्तगत केली आहे. त्यामुळे भाजपाकडे जरी उद्योगपती असले तरी आमच्या बाजूने सामान्य जनता असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांनी दिली आहे. यावरून भविष्यात होणारी लोकसभा आणि विधानसभेची ही नांदी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस राष्टवादीने हुरळून जाऊ नये- बाजार समितीचे जे निकाल आले आहेत, त्यामध्ये फारसे यश असे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला आल्याचं पाहायला मिळत नाहीय. कारण वर्षानुवर्ष सहकाराचे जाळे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे राहिले आहे. या दोन्ही पक्षांची सत्ता सहकारात कायम राहिलेली आहे. अशा पद्धतीने बाजार समितीमधील निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने भाजप आणि शिवसेनेने चांगल्या पद्धतीने मुसंडी मारली आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सहकारातही शिवसेना-भाजप युती प्राबल्य निर्माण करेल. आजच्या निकालावरून स्पष्ट जाणवत आहे. थोडाफार आकडा काँग्रेस राष्ट्रवादीचा वाढलेला दिसत असेल तरीही हुरळून जाण्यासारखा हा आकडा नाही. जिथे काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व होत तिथे भाजप शिवसेनेने चांगली मुसंडी मारली आहे. हे आजच्या निकालावरून लक्षात घेतले पाहिजे असे मत शिवसेना (शिंदे गट ) प्रवक्ते संजू भोर पाटील यांनी व्यक्त केले आहे.
वज्रमुठ अभेद्य आहे - रविवारी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील जनतेने आपला कल पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. गेल्या आठ-दहा महिन्यातील सरकार सत्तेत आल्यानंतर या काळात बाराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमालाला योग्य दर मिळत नाही. बाजार समितीच्या निवडणुका अधिक किचकट करण्याचा प्रयत्न या शिंदे सरकारने केला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी व सोसायटीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात किती जनमत मोठे आहे हे दाखवून दिले. हा महाविकास आघाडीचा मोठा विजय म्हणता येईल. वज्रमुठीला भेगा पडल्या अशा प्रकारची आमच्यावर टीका झाली. पुन्हा एकदा वज्रमुठ अभेद्य आहे, हे आमच्या विरोधकांना कळले असेल. शेतकऱ्यांनी देखील त्यांचा प्रचंड रोष दाखवून दिला. अनेक मंत्र्यांच्या मतदारसंघातील बाजार समितीमध्ये देखील महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळ्याबद्दल सर्वांचे आभारदेखील जयंत पाटील यांनी मानले आहेत.
भाजप नंबर वन- मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. सर्वाधिक जागा म्हणजे 201 जागा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मिळाल्या आहेत. त्यामुळे मतदारांचा मूड हा भाजपसोबत असल्याचे स्पष्ट होत आहे. शिवसेनेला 42 ठिकाणी यश मिळाले. उद्धव ठाकरे गटाला 22 ठिकाणी यश मिळाले. भारतीय जनता पार्टी राज्यातला सर्व निवडणुकीमधील नंबर एकचा पक्ष यामुळे सिद्ध होत असा दावा भाजपा प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी केला आहे