मुंबई - ब्रिटन आणि युरोपमध्ये आलेल्या नव्या स्ट्रेन विषाणूबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नव्या वर्षात नाईट कर्फ्युसारख्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, याबाबत अधिक काळजी नसावी, सरकारने घालून दिलेले नियम नागरिकांनी पाळावेत, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. ते यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
जरी युरोपीय काही देशात आणि ब्रिटनमध्ये लॉकडाउन करण्यात आले असले तरी भारतीय जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही. उपलब्ध होत असलेली लस या नव्या स्ट्रेनवरही लाभदायक असल्याचे दिसून येत आहे. तसेच या व्हायरसबाबत राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेतही संशोधन सुरू आहे. त्याचा अहवाल आयसीएमआरला सादर केला जाईल. तोपर्यंत सरकारने केलेल्या नियमावली पाळावी लागेल, असेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा - कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना इतर आजारांनी ग्रासले; निमोनिया, श्वसनाचे विकार, सांधेदुखीचा त्रास
राज्य सरकार लसीकरणासाठी तयार; मात्र,
राज्य सरकार लसीकरणाच्या दृष्टीने तयारीत आहे. सध्या १६ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारत बायोटेक, सिरम या संस्थेने केंद्राकडे परवानगी मागितली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ऑक्सफर्ड ही लस देण्यासाठी तयारीत आहे. मात्र, कोणती लस घ्यायची हा केंद्राचा निर्णय आहे. त्यांनी त्वरित घेऊन राज्यांना सूचित करावे, महाराष्ट्राची लसीकरण करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आता केवळ केंद्राच्या निर्देशांची आम्ही वाट पाहत आहोत, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील कोरोना -
काल (मंगळवारी) राज्यात ३,१०६ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,०२,४५८ वर पोहचला आहे. राज्यात आज ७५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४८,८७६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ५८,३७६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.