मुंबई - कोरोना काळात आधी बेड, मग रेमडेसिवीर-टोसिलीज़ुमाब औषधांचा तुडवडा जाणवत होता. तर आता राज्यात प्राणवायू अर्थात ऑक्सिजनचा तुडवडा भासत असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, अन्न आणि औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मात्र राज्यात ऑक्सिजनचा अजिबात तुडवडा नसल्याचे 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले. तर सध्या राज्यात 870 टनची मागणी असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात मात्र कोरोना रुग्णांसाठी 500 टन इतकेच ऑक्सिजन लागत आहे. सध्या दिवसाला 1 हजार 200 टन ऑक्सिजननी निर्मिती होत आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजनची कमतरता नाही. तर केवळ ऑक्सिजच्या वितरणात अडथळे येत आहेत. तो सोडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही डॉ. शिंगणे यांनी सांगितले.
ऑक्सिजनच्या तुडवड्याच्या पार्श्वभूमीवर आज (सोमवारी) अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) मुख्यालयात एक महत्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला एफडीए अधिकारी, मुंबईतील दोन मोठे ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपन्याचे प्रतिनिधी आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यभरात ऑक्सिजनच्या मागणी आणि पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. तर ऑक्सिजनची गरज सध्या कुठे जास्त आहे, कुठे ऑक्सिजनचे वितरण करण्यात अडथळे येत आहे यासह अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाल्याचेही डॉ. शिंगणे यांनी सांगितले.
दरम्यान, सप्टेंबरपासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. या अनुषंगाने गंभीर रुग्ण वाढत आहेत. यातील अनेकांना ऑक्सिजन लागत आहे. त्यामुळे सध्या ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. मात्र, ऑक्सिजनची कमतरता राज्यात कुठेही नाही. राज्याकडे पुरेसा ऑक्सिजनचा साठा आहे, हे आजच्या आढावा बैठकीतून समोर आले, अशी माहिती डॉ. शिंगणे यांनी दिली. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार एकूण रुग्णांच्या 15 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. त्याप्रमाणे आपण आधीपासूनच त्यादृष्टीने काम करत आहोत. तर सध्या राज्यात 11 ते 12 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. आज राज्यभरातील विविध रुग्णालयात 12 हजार रूग्ण गंभीर आहेत. यातील 7 हजार 840 रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. ही गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून केला जात आहे, असेही डॉ शिंगणे यांनी सांगितले.
दरम्यान, आज राज्यात 870 टन ऑक्सिजन लागत असल्याचे म्हटले जात आहे. केवळ कॊरोना रुग्णांचा विचार केला तर राज्यात आजच्या घडीला 500 टन ऑक्सिजन लागत आहे. मुळात आता 80 टक्के ऑक्सिजन केवळ वैद्यकिय वापरासाठी वापरणे बंधनकारक आहे. त्यामुळे 1000 टन साठा दररोज असतो. तेव्हा ऑक्सिजन कुठेही कमी पडत नाही. फक्त लिक्विड ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलेंडर पोहचवणे अवघड होते होते. मात्र, आता यातील अडथळे ही आता दूर केले जात आहेत. त्यामुळे आता राज्यभर ऑक्सिजनचा पुरवठा आठवड्याभरात सुरळीत होईल, असेही डॉ. शिंगणे यांनी सांगितले.
नागपूरला भिलईमधून ऑक्सिजनचा पुरवठा -
ऑक्सिजनचे प्लांट हे मुंबई, पुणे, ठाणे अशा शहरात आहेत. तर काही शहरातील प्लांट बंद आहेत. त्यामुळे ऑक्सिजन पोहचवण्यास विलंब होत आहे. याही अडचणी सोडवण्याचे आदेश यंत्रणाना देण्यात आल्याचे डॉ शिंगणे यांनी सांगितले. दरम्यान, नागपूर, लातूर, कोल्हापूर, सांगली, नांदेड या जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुडवडा भासत आहे. हा तुडवडा केवळ वितरणामुळे आहे. तेव्हा येथील परिस्थिती लवकरच सुधारेल. तर नागपूरमधील ऑक्सिजनचा प्रश्न निकाली लावण्यासाठी मध्य प्रदेश राज्याची मदत घेण्यात आली आहे. आता तेथील भिलईमधून नागपूरला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील ही प्रश्न निकाली काढण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.