मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदरशात मार्चपासून एनसीईआरटीचा अभ्यासक्रम लागू करण्याची घोषणा केली आहे. याबाबत माहिती घेतली असता मुंबईत मुस्लिम समाजातील विद्यार्थी शाळांमध्ये जातात. यामुळे कोणताही मदरसा पूर्णवेळ चालत नाहीत. या मदरशात केवळ तासभर धार्मिक शिक्षण घेण्यासाठी मुस्लिम धर्मीय विद्यार्थी येतात, अशी माहिती मदरसा चालकांकडून देण्यात आली आहे.
मदरसा म्हणजे काय : मुस्लिम धर्मीयांमध्ये धार्मिक शिक्षण देण्यासाठी मदरसा चालवला जातो. बहुतेक मदरसे हे मशिदीमध्ये असतात. यात विद्यार्थी येवून शिक्षण घेतात. काही मदरसे हे पूर्णवेळ तर काही मदरसे हे अर्धावेळ चालतात. पूर्णवेळ चालणाऱ्या मदरसामध्ये विद्यार्थ्यांना धार्मिक आणि इतर शिक्षण दिले जाते.
मुंबईत तासाभरासाठीच मदरसा : मुंबईतील बहुतेक सर्वच मुस्लिम समाजातील विद्यार्थी सरकारी आणि खासगी शाळांमध्ये शिक्षण घेतात. शिक्षण घेण्यासोबत ते खासगी शिकवणी वर्गात म्हणजे क्लासेसमध्ये जातात. यामुळे मुंबईत एकही पूर्णवेळ मदरसा नाही. शाळा आणि क्लासेस करून तासाभरासाठी विद्यार्थी मदरसामध्ये येतात. त्यांना आवडीचे धार्मिक शिक्षण दिले जाते, अशी माहिती मुंबईतील मदरसामधील शिक्षक असलेले सफवान भाई यांनी दिली.
छंद म्हणून मदरशात : मुंबईत सुमारे ६०० मदरसे आहेत. यामध्ये एका तासासाठी सुमारे ६० हजार विद्यार्थी येतात. इतर विद्यार्थी ज्याप्रमाणे आपले छंद जोपासण्यासाठी नृत्य, चित्रकला आदी क्लासला जातात. त्याचप्रमाणे मदरसामध्ये हे विद्यार्थी एक तास येवून त्यांच्या आवडीचे धार्मिक शिक्षण घेतात. मुस्लिम समाजातील विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत असल्याने त्यांना सरकारी आणि खासगी शाळेत शिक्षण मिळत असल्याची माहिती सफवान भाई यांनी दिली आहे.
९९ टक्क्यांहून अधिक मदरसे अर्धवेळ : मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी मदरसे असतात. पूर्णवेळ आणि अर्धवेळ असे दोन प्रकारचे मदरसे चालतात. महाराष्ट्रात ९९ टक्क्यांहून अधिक मदरसे अर्धवेळ काही तासांसाठी चालतात. १ टक्क्यांहून कमी प्रमाणात मदरसे हे पूर्ण वेळ आहेत. राज्यात केवळ ५ ते ६ पूर्णवेळ मदरसे असू शकतात, ज्यात विद्यार्थ्यांना पूर्णवेळ शिक्षण दिले जाते, अशी माहितीही सफवान भाई यांनी दिली.
उत्तर प्रदेशमध्ये हा निर्णय : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदरसामध्ये एनसीईआरटीचा अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्चपासून हा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशमधील मदरसामध्ये धार्मिक शिक्षणासोबत शिक्षण विभागाद्वारे शिक्षण दिले जाणार आहे. मदरसामधील विद्यार्थ्यांना ड्रेस कोड लागू केला जाणार आहे, शिक्षकांची टीईटीच्या धर्तीवर एमटीईटी मदरसा टीचर एलिजिबिलिटी परिक्षा घेतली जाणार आहे.
हेही वाचा : CET Exam For Admission : सीईटी परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ! परीक्षा 'या' तारखेला होणार