मुंबई : म्हाडाच्या औरंगाबाद गृहनिर्माण, क्षेत्रविकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) व म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत औरंगाबाद, लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद येथे उभारलेल्या ९३६ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणीचा आरंभ आज करण्यात आला. सोडतीसाठी दिनांक ०९ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजेपासून ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. तर, दिनांक १० मार्च २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. MHADA Housing Lottery System IHLMS 2.0 या संगणकीय ऍप अंतर्गत व https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करता येणार आहे. उपरोक्त नमूद मुदतीनंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक संकेतस्थळ, अॅपवरून निष्क्रिय करण्यात येणार आहे. सोडतीसाठी अँप, संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज नोंदणी, अर्ज सादर करणे आदी सर्व प्रक्रिया विनाशुल्क आहेत.
२२ मार्चला सोडत जाहीर : या सोडतीसाठी ऑनलाईन अनामत रकमेच्या स्वीकृतीस ०९ फेब्रुवारी, २०२३ रोजी दुपारी १२ वाजेपासून प्रारंभ होणार आहे. तर, ११ मार्च, २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे. तसेच दिनांक १३ मार्च, २०२३ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. अशाप्रकारे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदाराच या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जाणार आहे. सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी १८ मार्च, २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर केली जाणार आहे. दिनांक २२ मार्च, २०२३ रोजी पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत औरंगाबाद येथील मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे सकाळी ११.०० वाजता जाहीर केली जाणार असून अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे, ई-मेल द्वारे,अॅपवर तसेच संकेतस्थळावर प्राप्त होणार आहे.
कागदपत्रे पूर्तता नंतर पात्रता : म्हाडातर्फे तयार करण्यात आलेले MHADA Housing Lottery System IHLMS 2.0(Integrated Housing Lottery Management system) या नूतन संगणकीय अॅपचा वापर करणारे औरंगाबाद मंडळ हे म्हाडाचे दुसरे मंडळ आहे. नव्या प्रक्रियेनुसार नोंदणीकरणा दरम्यान सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार हे म्हाडाच्या विविध मंडळांच्या संगणकीय सोडतीतील कायमस्वरूपी पात्र अर्जदार ठरणार आहे.
घरून अर्ज करू शकता : नवीन आज्ञावली नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरणार आहे. कारण अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या अॅपच्या माध्यमातून सहजरित्या उपलब्ध होणार आहेत. सोडतीत सहभागी होण्याकरिता MHADA Housing Lottery System IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android) अथवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमच्या साहाय्याने आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकतात. अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऍप डाउनलोड करण्याची लिंक : तसेच येथे अॅप डाउनलोड करण्याची लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, व्हिडीओस, हेल्प फाईल आणि हेल्प साईट या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहितीचे अवलोकन करावे, 'असे आवाहन औरंगाबाद मंडळाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी केले आहे. नूतन सोडत संगणकीय सोडत प्रणालीचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे यशस्वी अर्जदारांना आपल्या सदनिकेचे तात्पुरते देकारपत्र पुढील दोन दिवसांतच ऑनलाईन अॅपमध्ये प्राप्त होणार आहे.
अत्यल्प,अल्प,मध्यम,उच्च उत्पन्न गटासाठी सदनिका : औरंगाबाद गृहनिर्माण, क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ९३६ सदनिकांपैकी ६०५ सदनिका प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत आहेत. म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३८ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी ६५ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी १५१ सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी ३ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व उत्पन्न गट या गटांतर्गत ७४ सदनिका असून या गटासाठी उत्पन्न मर्यादा शिथिल करण्यात आली आहे.
सोडतीसाठी अर्ज नोंदणीकरिता करा संपर्क : ०२२६९४६८१०० व ऑनलाईन पेमेंट करिता ८८८८०८७७६६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुख्य अधिकारी श्री. शिंदे यांनी केले आहे. शिंदे यांनी सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना आवाहन केले आहे की, नूतन संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन, पारदर्शक असून कोणत्याही प्रकारे मानवीय हस्तक्षेपास वाव नाही. शिवाय या सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार, प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ /दलाल/ मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस औरंगाबाद मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही असे देखील ते म्हणाले.
हेही वाचा - Nana Patole : प्रदेशाध्यक्षपद वाचवण्यासाठी नाना पटोले दिल्लीला जाणार? ऐका ते काय म्हणाले