मुंबई : सन 2030 पर्यंत स्वत:ला कार्बनमुक्त करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या निश्चयात हातभार लावण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने पर्यावरण रक्षणासाठी अक्षय्य ऊर्जेचा वापर तसेच लाखो रुपयांची बचत करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. लोणावळा आणि खंडाळा पट्टा थंड हवेचे ठिकाण असून खूपच लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. लोणावळा स्टेशन व त्यालगतचा रेल्वे परिसर पूर्णपणे स्वच्छ आणि हरीत उर्जेवर चालविला जाणार आहे. लोणावळा आणि खंडाळा दरम्यान सध्या अस्तित्वात असलेल्या हिरवळीच्या शिरपेचात हा तुरा ठरणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील इतर रेल्वे स्थानकांसह लोणावळा आता सौरउर्जेचा वापर करणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या एलिट क्लबमध्ये समाविष्ट आहे. मध्य रेल्वेने हरित उर्जा उत्पादन आणि दरवर्षी लाखो रुपयांच्या वीज बिलात बचतीसह ग्लोबल वार्मिंग कमी करण्यासाठी आणि हवामान बदलांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी अनेक महत्त्वाचे हरित उपक्रम हाती घेतले आहेत. मध्य रेल्वेने स्टेशन लाईटिंग व्यतिरिक्त सोलर पॅनेल्स, सौर झाडे आणि सौर वॉटर कूलर इत्यादी देखील स्थापित केले आहेत.
लोणावळा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. 2 व 3 वरील छतावर 76 किलोवॅट उर्जा निर्मितीसाठी सौर पॅनेल्स लावण्यात आले आहेत. सौर पॅनेल्समधून वर्षाकाठी 68 हजार 400 किलोवॅट्स क्षमतेची उर्जा उत्पन्नासह लोणावाला रेल्वे स्टेशनच्या वीजबिलात बचत होईल. लोणावळा स्टेशनच्या बाजाराच्या दिशेने बागेची रोषणाई करण्यासाठी दोन सुंदर सौर झाडे प्रत्येकी 4 * 10 वॅट एलईडी फिटिंग्जसह 40 वॅट सौर पॅनेल्सने एकत्रित करून उभारण्यात आल्या आहेत. लोणावळ्यातील प्रवाशांच्या दृष्टीने ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट असल्याचे सिद्ध झाले आहे. लोणावळा स्थानकात एक सौरऊर्जेवर चालणारे वॉटर कूलरदेखील देण्यात आले आहे.
बीव्हीटी यार्डातील लोको पायलट / गार्ड रनिंग रुमच्या प्रवेशासाठी 33 वॅटचे सहा आउटडोर इंटिग्रेटेड टाइप सोलर स्ट्रीट पोल दिले आहेत. लोणावळा येथील बीव्हीटी यार्डमध्ये, ग्रीन गँगहट तयार केली आहे. यामध्ये 1 किलोवॅटचे छतावरील स्टोरेज सारखे सौर पॅनेल्ससह दोन 160 एएच बॅटरी आणि 1 केव्हीए इन्व्हर्टर देण्यात आले आहेत. खंडाळा स्थानकाजवळ लेव्हल क्रॉसिंग गेट क्र. 30 येथे 1 किलोवॅटचे छतावरील स्टोरेजसारखे सौर पॅनेल्ससह दोन 160 एएच बॅटरी आणि 1 केव्हीए इन्व्हर्टरसह देण्यात आली आहे. अक्षय्य ऊर्जेच्या या सर्व वापरामुळे खंडाळा-लोणावळा रेल्वेचा पट्टा हरित व स्वच्छ उर्जेकडे वळला आहे. प्रकाशासाठी आणि बॅटरी चार्ज करण्याव्यतिरिक्त मध्य रेल्वेने पेण, आपटा, रोहा, नेरळ आणि लोणावळा स्थानकांवर प्रत्येकी एक सौरऊर्जेवर चालणारे वॉटर कूलर उपलब्ध करुन दिले आहेत. सौरऊर्जेद्वारे चलित वॉटर कूलरमुळे वर्षाकाठी 1.45 लाख रुपयांची बचत होण्याची अपेक्षा आहे.