मुंबई - लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही आता प्रचारसभांमधून नेत्यांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. निवडणुकांचे बिगूल वाजल्यानंतर चर्चा, दिवसरात्र बैठकीअंती जागा वाटपाचा तिढा सोडवत सर्वच राजकीय पक्षांनी आप-आपले उमेदवार घोषित केले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांपैकी ३३ ठिकाणच्या लढती निश्चित झाल्या आहेत. यापैकी काही ठिकाणी 'काँटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे. तर चला पाहुया कोणते आहेत हे मतदारसंघ आणि कोण आहेत तिथले उमेदवार
- नागपूर -
नितीन गडकरी (भाजप) वि. नाना पटोले (काँग्रेस)
नागपूर लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नितीन गडकरी हे भाजपचे उमेदवार आहेत. तर त्यांच्या समोर काँग्रेसचे नाना पटोले हे असणार आहेत. भाजपच्या खासदारीकीचा राजीनामा देऊन त्यांनी काही दिवसांआधीच काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. नाना पटोले २०१४च्या निवडणूकीत भंडाऱ्यातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. एकेकाळी चांगले संबंध असलेले दोन नेते विरोधात उभे राहणार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत गडकरी यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांचा तब्बल २ लाख ८५ हजार मतांनी पराभव केला. मुत्तेमवार यापूर्वी नागपुरातून चार वेळा विजयी झाले होते. मात्र, गेल्यावेळच्या पराभवानंतर पक्षाने नवा चेहरा द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून पुढे आली होती. शेवटी मुत्तेमवार यांनी एक पाऊल मागे सरत पटोले यांचे नाव समोर केले.
- औंरगाबाद -
चंद्रकांत खैरे (शिवसेना) वि. सुभाष झांबड (काँग्रेस)
औंरगाबादचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याशी काँग्रेसच्या सुभाष झांबड यांचा मुकाबला होणार आहे. झांबड हे औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. झांबड हे औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल सत्तार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. मात्र, अब्दुल सत्तार स्वतः येथून निवडणूक लढवण्यास उत्सूक असल्याचेही बोलले जात आहे.
- चंद्रपूर -
विनायक बांगडे (काँग्रेस) वि. हंसराज अहिर (भाजपा)
चंद्रपूरमध्ये भाजपचे विद्यमान खासदार आणि राज्यमंत्री हंसराज अहीर आणि काँग्रेसचे विनायक बांगडे यांच्यात लढत होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल मुत्तेमवार यांना उमेदवारी मिळणार असे सांगितले जात होते. याबरोबरच शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, हा निर्णय वरिष्ठांकडून घेण्यात आला आहे. मी ही या निर्णयावर नाराज असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांकडून सांगण्यात आले आहे. याबद्दलची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे.
- शिरूर -
शिवाजी आढळराव पाटील (शिवसेना) वि. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
शिवसेनेने शिरूर मतदारसंघातून विद्यमान खासदार आढळराव-पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ते मागील १५ वर्षांपासून खासदार आहेत. त्यामुळे त्यांचा यावेळी विजयाचा चौकार मारण्याचा मनसुबा आहे. मात्र, यावेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. अमोल कोल्हे यांना मैदानात उतरविले आहे. या दोघांनीही गेल्या काही दिवसांपासून प्रचाराला प्रारंभ केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात जुन्या-नव्यामधील राजकीय संघर्ष पहावयास मिळणार आहे. ही लढत चुरशीची होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
- मावळ -
पार्थ पवार (राष्ट्रवादी) वि. श्रीरंग बारणे (शिवसेना)
शिवसेनेने मावळ मतदार संघातून श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला आहे. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि बारणे यांच्यातील लढत रंगतदार होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पार्थ पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. गेल्या निवडणुकीत तत्कालीन खासदार गजानन बाबर यांना डावलून बारणेंना उमेदवारी मिळाली होती. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. युतीचे बारणे-जगताप यांच्या वादात पार्थ पवार यांना फायदा होऊ नये, यादृष्टीने शिवसेनेने मोर्चेबांधणी केली आहे. बारणे-जगताप यांच्यातील राजकीय वैर दूर करण्यासाठी एक गट प्रयत्नशील आहे. मात्र, त्याला अद्याप यश आलेले नाही.
- सोलापूर -
डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी विरुद्ध सुशीलकुमार शिंदे
सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी निवडणूक लढणार आहेत. विद्यमान खासदार शरद बनसोडेंचा पत्ता कट करून जय सिद्धेश्वर स्वामींना तिकीट देण्यात आले आहे. या ठिकाणच्या निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. त्याचे कारण म्हणजे या ठिकाणी काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
- बीड -
डॉ. प्रीतम मुंडे (भाजपा) वि. बजरंग सोनावणे (राष्ट्रवादी)
बीड लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बजरंग सोनवणे हे रिंगणात उतरले आहेत. भाजपतर्फे प्रीतम मुंडे यांची उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जात होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनपेक्षितपणे पक्षाचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाली. माजी आमदार अमरसिंह पंडित लोकसभा लढवण्यास उत्सूक होते मात्र, ऐनवेळी त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली. राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे संपूर्ण जिल्ह्याला आश्चर्याचा धक्का बसला आहे.
- लातूर -
सुधाकर शृंगारे (भाजप) वि. मच्छलिंद्र कामंत (काँग्रेस)
भारतीय जनता पक्षाने विद्यमान खा. डॉ. सुनील गायकवाड यांना तिकीट नाकारले आहे. जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे हे भाजपचे उमेदवार असतील. तर काँग्रेसकडून या जागेवर मच्छिंद्र कामत हे निवडणूक लढवणार आहेत.
- जालना -
रावसाहेब दानवे (भाजप) वि. विलास औताडे (काँग्रेस)
जालना लोकसभा मतदारसंघात भाजपकडून राज्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे विलास औताडे निवडणूक लढवणार आहेत. मागील २० वर्षांपासून भाजपचा या मतदार संघावर कब्जा आहे. १९९९मध्ये दानवे यांनी या मतदारसंघाच विजय मिळवल्यानंतर तेव्हापासून काँग्रेसला ही जागा मिळवता आलेली नाही. दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने दानवे आणि भाजपसाठी ही लढाई प्रतिष्ठेची समजली जाते.
- धुळे -
डॉ. सुभाष भामरे (भाजप) वि. कुणाल पाटील (काँग्रेस)
धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपने संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर केली. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून कुणाला पाटील यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. तर धुळ्यातून भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपविरुद्ध शडडू ठोकले आहे. २६ वर्षांचे वैर विसरून आमदार अनिल गोटेंनी दोन दिवसांआधीच पवारांशी भेट घेतली. ही भेट भाजपच्या भामरेंना पाडण्यासाठी घेण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
- शिर्डी -
सदाशिव लोखंडे (शिवसेना) वि. भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)
शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विखे यांना कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी रणनीती आखल्याचे दिसून येते. याचाच एक भाग म्हणून श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा काँग्रेसच्या पहिल्याच यादीत सामावेश करून शिर्डीतून उमेदवारी जाहीर झाली. विखे यांचे दुसरे समर्थक करण ससाणे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. शिर्डी मतदारसंघात विखेंच्या प्रतिष्ठेची कसोटी लागणार आहे.
- नंदुरबार
डॉ. हीना गावित (भाजप) वि. के. सी. पाडवी (काँग्रेस)
नंदूरबारातून भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. हीना गावित यांनाच पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून के.सी.पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. २०१४ला गावित यांनी या मतदारसंघातून नऊ वेळा खासदार असलेल्या माणिकराव गावित यांचा पराभव केला होता. यावेळी गावित यांचा सामना के. सी.पाडवी यांच्याशी असणार आहे.
- जळगाव
स्मिता वाघ (भाजपा) वि. गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
- बुलडाणा
प्रतापराव जाधव (शिवसेना) वि. डॉ राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
- वर्धा
रामदास तडस (भाजपा) वि. अॅड. चारुलता टोकस (काँग्रेस)
- गडचिरोली-चिमूर
अशोक नेते (भाजप) वि. डॉ. नामदेव उसेंडी (काँग्रेस)
- यवतमाळ -वाशिम
माणिकराव ठाकरे (काँग्रेस) वि. भावना गवळी (शिवसेना)
- परभणी
राजेश विटेकर (राष्ट्रवादी) वि. संजय जाधव (शिवसेना)
- दिंडोरी
धनराज महाले (राष्ट्रवादी) वि. डॉ. भारती पवार (भाजप)
- नाशिक
समीर भुजबळ (राष्ट्रवादी) वि. हेमंत गोडसे (शिवसेना)
- भिवंडी
कपिल पाटील (भाजप) वि. सुरेश टावरे (काँग्रेस)
- कल्याण
श्रीकांत शिंदे (शिवसेना) वि. बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)
- ठाणे
राजन विचारे (शिवसेना) वि. आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
- उत्तर मध्य मुंबई
पूनम महाजन (भाजपा) वि. प्रिया दत्त (काँग्रेस)
- दक्षिण मध्य मुंबई
राहुल शेवाळे (शिवसेना) वि. एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
- मुंबई दक्षिण
मिलिंद देवरा (काँग्रेस) वि. अरविंद सावंत (शिवसेना)
- रायगड
अनंत गीते (शिवसेना) वि. सुनील तटकरे (राष्ट्रवादी)
- बारामती
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) वि. कांचन कुल (भाजपा)
- उस्मानाबाद
ओमराजे निंबाळकर (शिवसेना) वि. राणा जगजितसिंह (राष्ट्रवादी)
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग
विनायक राऊत (शिवसेना) वि. नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस)
- हातकणंगले
धैर्यशील माने (शिवसेना) वि. राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
- कोल्हापूर
धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) वि. संजय मंडलिक (शिवसेना)