मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून, यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्राकडून लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्यात आल्यानंतर राज्यभर कलम 144 लागू असून, संचारबंदी लागू करण्यात आलेले आहे. 22 मार्च ते 15 एप्रिल या काळामध्ये संपूर्ण राज्यात एकूण 43 हजार 391 गुन्हे नोंदविण्यात आले असून क्वारंटाईनच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 522 जणांवर राज्यभरात कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 78 घटना घडल्या आहेत. या गुन्ह्यात 162 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा फटका मुंबई पोलीस खात्याला बसला असून, 5 पोलीस अधिकारी आणि 14 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. लॉकडाऊनच्या काळात कोविड 19च्या संदर्भात 68 हजार 20 फोन कॉल 100 क्रमांकाच्या नियंत्रण कक्षावर आले असून, अनधिकृत वाहतुकीचे 1 हजार 1 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत वाहतूक प्रकरणी 8 हजार 823 जणांना अटक करण्यात आली असून, तब्बल 28 हजार 991 वाहन जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी या काळात 1 कोटी 80 लाख 10 हजारांचा दंड थोटावला आहे.
राज्यात कलम 144 व 188नुसार पुणे शहरातून सर्वाधिक 5633 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड 3574, नागपूर शहर 2726, नाशिक शहर 2729, सोलापूर 3204, गुन्हे नोंदविण्यात आले असून सर्वाधिक कमी गुन्हे रत्नागिरी 50 तर अकोला येथे 52 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
व्हिसा संदर्भात फॉरेनर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 156 परदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून यात मुंबईत 32, अहमदनगर 29 ,अमरावती 18, पुणे 8 नागपूर शहर 8 , ठाणे शर 21, चंद्रपूर 11, गडचिरोली 9, नवी मुंबई 10 तर नांदेडमध्ये 10 परदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.