मुंबई - 1 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत देशभरातील नियमित धावणाऱ्या मेल, एक्सप्रेस व मुंबईतील उपनगरीय लोकल बंद ठेवण्याचा निर्णय गुरुवारी रात्री रेल्वे बोर्डाने घेतला. मात्र, मुंबईच्या मध्य व पश्चिम उपनगरीय मार्गावर अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेल्या लोकल नियमित सुरूच राहणार असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून सुरू असलेल्या लांब पल्ल्याच्या विशेष व श्रमिक ट्रेन सुरूच राहणार आहेत. मात्र, १ जुलैपासून रेल्वे सेवा पूर्ववत होईल, अशी चर्चा होती. मात्र, सेवा सुरू करण्यासंबधी कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. रेल्वे तिकीट रद्द करण्याचा आणि सेवा सुरू होण्याचा काहीही संबध नाही. सेवा सुरू करण्याबाबतचा कोणताही निर्णय आरोग्य मंत्रालय आणि गृहमंत्रालयाशी चर्चा करून घेतला जाईल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. 23 जूनला रेल्वेने विभागाने अधिकृत पत्रक काढत 14 एप्रिल आणि आणि त्याआधी आरक्षित केलेली सर्व तिकिटे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना सर्व पैसे रेल्वे परत देणार आहे.
रेल्वे १२ ऑगस्टपर्यंत बंद असल्याच्या बातमीमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे प्रवाशांनी फोन करून कोणत्या रेल्वे रद्द करण्यात आल्या? याबाबत माहिती विचारली. अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेल्या लोकल, विशेष रेल्वे आणि श्रमिक ट्रेन सुरूच राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी चिंता करू नये, असे रेल यात्री परिषदेचे सुभाष गुप्ता यांनी सांगितले.