दिल्ली- कोरोना विषाणूचा जगभरात प्रादुर्भाव वाढत असून भारतासह महाराष्ट्रातही रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. याच धर्तीवर केंद्र तसेच राज्य सरकारने अनेक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशातील केरळमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आता महाराष्ट्र, तेलंगाणा, दिल्ली या राज्यांत रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
- राजस्थानमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या 4 वर पोहचली आहे. एका 31वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती नुकतीच स्पेनवरून परतली आहे.
- कोरोनामुळे कोणाचा मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या परिवाराला 4 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. तसेच, देशातील 84 रुग्णांपैकी 14 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना सोडण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे विशेष सचिवांनी सांगितले आहे.
कोरोना बाधितांची राज्यनिहाय आकडेवारी आणि घडामोडीसंबंधी माहिती खालील प्रमाणे:
- महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या:
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या 26 वर पोहोचली आहे.
- पुणे- 15
- मुंबई- 5
- कल्याण - 1
- ठाणे- 3
- अहमदनगर - 1
- नागपूर - 4
- यवतमाळ - 2 जण बाधीत, तर
- बुलडाणा - एका संशयिताचा मृत्यू
शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यभरातील नागपूर, ठाणे, नवी मुंबई, मुंबईसह पुण्यातील मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहे, जीम सारखी ठिकाण बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आलेली आहे.