मुंबई - साक्षरता हे प्रगत समाजाचे लक्षण आहे. साक्षरतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी युनेस्कोच्या वतीने दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस' साजरा केला जातो. जगभरातील शैक्षणिक अनुशेष दूर करण्याचा संकल्प यादिवशी केला जातो. मात्र, आपल्या देशात साक्षरतेची काय अवस्था आहे, त्यातही महाराष्ट्र राज्यातील साक्षरतेचे काय प्रमाणात आहे? याबाबत ईटीव्ही भारतने विशेष आढावा घेतला.
साक्षरतेत महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर -
साक्षरता, शिक्षण आणि सामाजिक जाणीव असलेला समाज लोकशाही समाजाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, हे ध्यानात घेऊन केंद्र शासनाने साक्षरतेच्या प्रसारासाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न केले आहेत. कोणत्याही भाषेमध्ये एखादा मनुष्य जर लिहू किंवा वाचू शकत असेल, तर त्याला साक्षर समजण्यात येते. साक्षरता आत्मसात करण्याचे प्रमुख साधन म्हणजे शिक्षण असून मूळाक्षरांची ओळख ही प्रथम पायरी होय. सात वर्षांवरील किती व्यक्तींना वाचता व लिहिता येते यावरुन साक्षरतेची टक्केवारी काढतात. मात्र खरी साक्षरता लोकांचे हक्क, अधिकार, कर्तव्यांची जाणीव, कौशल्य विकास, समाजात विकासाकरिता योगदान देण्याची भावना निर्माण करणे म्हणजे साक्षरता होय. गेल्या काही काळात भारतातही साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. परंतु ते समाधानकारक मुळात नाही. महाराष्ट्र राज्य विकसित असताना सुद्धा राज्यनिहाय साक्षरता आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल महाराष्ट्र राज्य हा सहाव्या क्रमांकावर येतो. त्यामुळे फक्त 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करून चालणार नाही तर यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण ८४.८ टक्के -
महाराष्ट्रात ८४.८ टक्के नागरिक साक्षर असून चित्र्यांच्या साक्षरतेचे प्रमाण ७८. ४ टक्के आहे, तर पुरुषांच्या साक्षरतेचे प्रमाण ९०. ४ टक्के आहे, तर मुंबई व मुंबई उपनगर मध्ये पुरुष साक्षरतेचे प्रमाण ९१ टक्के आहे. कारण हा पूर्णपणे नागरी विभाग आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील साक्षरतेचे प्रमाण महाराष्ट्राच्या सरासरी साक्षरते इतकी आहे तर मध्य महाराष्ट्र व पूर्व महाराष्ट्र विभागांमध्ये हे प्रमाण कमी आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार या जिल्ह्यांत आदिवासी जमातींचे प्रमाण जास्त असल्यामुळे साक्षरतेचे प्रमाण अतिशय कमी आहे.
जिल्हानिहाय साक्षरतेची टक्केवारी?
मुंबई शहर ८९.२ टक्के, मुंबई उपनगर ८९.९ टक्के, ठाणे ८४.५ टक्के,रायगड ८३.१ टक्के, रत्नागिरी ८२.२ टक्के, सिंधुदुर्ग ८५.६ टक्के, नाशिक ८२.३ टक्के, धुळे ७२.८ टक्के, नंदुरबार ६४.४ टक्के, जळगाव ७८.२ टक्के, अहमदनगर ७९.१ टक्के, पुणे ८६. २ टक्के, सातारा ८३.९ टक्के, सांगली ८१.५ टक्के, सोलापूर ८७.७ टक्के, कोल्हापूर ८१.५टक्के, औरंगाबाद ७९.० टक्के, जालना ७१.५ टक्के, परभणी ७३.३ टक्के, हिंगोली ७८.२ टक्के, बीड ७७. ० टक्के, नांदेड ७५.५ टक्के, उस्मानाबाद ७८.४ टक्के, लातूर ७७.३ टक्के, बुलढाणा ८३.४ टक्के, अकोला ८८.० टक्के, वाशिम ८३. २ टक्के, अमरावती ८७.४ टक्के, यवतमाळ ८२.८ टक्के, वर्धा ८७.० टक्के, नागपूर ८८.४ टक्के, भंडारा ८३.८ टक्के, गोंदिया ८५.० टक्के, चंद्रपूर ८०. ० टक्के आणि गडचिरोली ७४. ४ टक्के असे महाराष्ट्रातील जिल्हानिहाय साक्षरतेची आकडेवारी आहे.
देशाचा एकूण साक्षरता ७७.७ टक्के -
गेल्या वर्षी शिक्षण मंत्रालयाने देशातील राज्यनिहाय साक्षरता आकडेवारी जाहीर केली होती. त्या आकडेवारीनुसार, देशात पहिल्या पाच साक्षर राज्यांमध्ये अनुक्रमे केरळ, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आसामचा क्रमांक लागतो. साक्षरतेनुसार देशात महाराष्ट्र साहाव्या क्रमांकावर आहे. तर बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेश ही तीन राज्ये सर्वात खाली असल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली होती. तर ग्रामीण भारताचा साक्षरता दर हा ७३.५ टक्के, तर शहरी भागातील साक्षरतेचा दर ८७.७ टक्के आहे. तसेच, देशाचा एकूण साक्षरता दर हा ७७.७ टक्के असल्याचे या अहवालात समोर आले होते.
राज्यनिहाय साक्षरता दर -
केरळ ९६.२ टक्के, दिल्ली ८८.७ टक्के, उत्तराखंड ८७.६ टक्के, हिमाचल प्रदेश ८६.६ टक्के, आसाम ८५.९ टक्के, महाराष्ट्र ८४.८ टक्के, पंजाब ८३.७ टक्के, गुजरात ८२.४ टक्के, तामिळनाडू ८२.९ टक्के, पश्चिम बंगाल ८०.५ टक्के, हरियाणा ८०.४ टक्के, ओडिशा ७७.३ टक्के, जम्मू-काश्मिर ७७.३ टक्के, छत्तीसगड ७७.३ टक्के, कर्नाटक ७७.२ टक्के, झारखंड ७४.३ टक्के, मध्यप्रदेश ७३.७ टक्के, उत्तरप्रदेश ७३ टक्के, तेलंगाणा ७२.८ टक्के, बिहार ७०.९ टक्के, राजस्थान ६९.७ टक्के आणि आंध्रप्रदेशमध्ये ६६.४ टक्के साक्षरता दर आहे.