मुंबई - राज्यात १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊननंतर मुंबई, ठाण्यात रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र विदर्भ, मराठावाडा आणि बाकीच्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी होतानाची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे राज्यतील लॉकडाऊन वाढविण्याविषयी कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट संकेत मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिले आहेत.
लॉकडाऊन वाढणार?
२२ एप्रिलच्या रात्री आठ वाजल्यापासून ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले. १ मेपर्यंत निर्बंध राहतील. दरम्यान, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली आहे. १ मे रोजी राज्यातील लॉकडाऊन संपेल अशा आशेवर राज्यातील नागरिक होते. मात्र विदर्भ, मराठवाड्यातील परिस्थितीकडे आता लक्ष न दिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई ठाणे, पुणे भागात रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या घटली आहे. मात्र राज्यातील इतर जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत बिकट अवस्थेत आहे. यामुळे राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्यास लॉकडाऊन वाढवण्याची गरज असेल, असे संकेत मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नवी नियमावली लागू होण्याची शक्यता आहे.