मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एल.आय.सी.ची भागीदारी विकणार असल्याचे सांगितले आहे. सरकारच्या या निर्णयाचा एलआयसीच्या कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध सुरू केला असून मुंबई मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांनी सोमवारी आंदोलन केले. यासंदर्भात भारतीय आयुर्विमा महामंडळ कर्मचारी सेनेचे पदाधिकारी महेश लाड यांनी ईटीव्ही भारतसोबत विशेष बातचीत केली.
हेही वाचा - मनसेने मोर्चाचा मार्ग बदलला; सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी नाकारली परवानगी
केंद्र सरकारने आयपीओ म्हणजेच इनिशिअल पब्लिक ऑफरिंगच्या माध्यमातून एलआयसीमधील भागीदारी विकण्याची घोषणा केली आहे. एलआयसी सध्या १०० टक्के सरकारी कंपनी आहे. आयपीओद्वारे कंपनीची भागीदारी खासगी क्षेत्राकडे जाणार आहे. यातून जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होण्याची अधिक चिन्हे असल्याची भीतीही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, एलआयसीच्या खासगीकरणाचा निर्णय अतिशय चुकीचा असून या निर्णयाचा तीव्र विरोध देशभरात होणार असून कोणत्याही परिस्थितीत खासगीकरणाचा निर्णय हाणून पाडू, असा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.