मुंबई - अंधेरीत पूर्व परिसरात पुन्हा एकदा घनदाट जंगलातुन आलेल्या बिबट्यांचे दर्शन झाल्याचे पहायला मिळाले आहे. अंधेरीतील सिप्झ एमआयडीसी भागात गेट क्र. 1 समोरील केंद्र शासनाच्या कार्यालयाच्या आवारात हा बिबट्या आढळला आहे.
शनिवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान केंद्रिय कार्यालयाच्या आवारातील संरक्षक भीतीवर रात्रीच्या अंधारात बिबट्या उभा आणि संरक्षक भीतीवरुन चालत असल्याचे सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आले. तत्काळ सुरक्षा रक्षकांनी आपल्या स्वतःच्या मोबाईल कॅमेऱ्यात कार्यालयाच्या सुरक्षा रुम मधून बिबट्यांच्या हालचालीचे छायाचित्रण केले.
हेही वाचा - उज्ज्वला योजनेत घोटाळा: लाखो लाभार्थ्यांकडून ३ ते ४१ सिलिंडरचा मासिक वापर - कॅग
शुक्रवारी पहाटेच्या दरम्यानही कार्यालयाच्या आवारात बिबट्यांचा वावर असल्याचे सीसीटीव्ही तपासणी दरम्यान पहायला मिळाले. बिबट्याचा वावर कार्यालय आवारात वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे वन अधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावून जेरबंद करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.