मुंबई - राज्य विधानमंडळाचे १७ जून पासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. या अधिवेशनात विधानपरिषदेत १७ जून ते २ जुलै २०१९ या काळात विधान परिषदेच्या एकूण १२ बैठका झाल्या. त्यात प्रत्यक्षात ६८ तास ७ मिनिटे कामकाज झाले. विविध कारणांमुळे १२ तास १४ मिनिटे वाया गेली. रोजचे सरासरी ५ तास ४० मिनिटे कामकाज झाले. यात २ हजार ८२५ तारांकित प्रश्न आले. त्यातील ९७२ प्रश्न स्वीकारले गेले. तर ३७ प्रश्नांना सभागृहात उत्तरे देण्यात आली.
या अधिवेशनात नियम ९३ च्या ८१ सूचना स्वीकारण्यात आल्या. १४ सूचनांवर निवेदने झाली. १६ निवेदने पटलावर ठेवण्यात आली. औचित्याचे ९५ मुद्दे प्राप्त झाले. त्यातील २९ पटलावर ठेवण्यात वा मांडण्यात आले. ७७२ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या. त्यातील २०५ मान्य झाल्या. तर त्यातील ५८ सूचनांवर चर्चा झाली.
१३८ विशेष उल्लेखाच्या सूचना मांडण्यात वा पटलावर ठेवण्यात आल्या. २ अल्पकालीन सूचनांवर चर्चा झाली. एका शासकीय ठरावावर तर अर्ध्या तासाच्या ६ चर्चा झाल्या. शिक्षणमंत्री असताना शिक्षक आमदारांचे समाधान न करणारे मंत्री म्हणून प्रसिद्ध असलेले व यावेळी संसदीय कार्य मंत्रीपदाची जबाबदारी घेलेल्या विनोद तावडे यांच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच हे अधिवेशन झाले. या अधिवेशनात विधान परिषदेचे कामकाज अतिशय सुरळीतपणे पार पडले. मंत्री उपस्थित नसल्यामुळे कामकाज बंद पडण्याचे अनेक प्रसंग उद्भवतात. परंतु, यावेळी मंत्री उपस्थित नसल्यामुळे सभागृहाचा फार वेळ वाया गेला नाही. मात्र, अधिकारी नसल्याने सभागृह तहकूब करण्यापर्यंत विषय समोर आले होते.