मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या टाळेबंदीत नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असताना, मुंबईचे पालकमंत्री तोंड लपवून बसले आहेत का, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. एकीकडे विरोधपक्षांच्या हिट लिस्टवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना आता त्यांचे पुत्र मुंबई शहराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधण्यात येत आहे. त्याचबरोबर उपनगराचे पालकमंत्री अस्लम शेखही जनतेला धीर देण्यासाठी उपस्थित राहत नसल्याचा आरोप दरेकर यांनी केला.
दरम्यान, या संदर्भात आदित्य ठाकरे यांचा संपर्क होऊ शकला नाही. मात्र, आरोग्य समिती अध्यक्ष आणि ठाकरे यांचे निकटवर्तीय शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी दरेकर यांचे मुद्दे खोडून काढले आहेत. आदित्य ठाकरे मतदार संघात येतात. तसेच तिथल्या परिस्थिचा आढावा ही घेतात. गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वरळीतील इनडोअर वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आदित्य ठाकरे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे घोले यांनी सांगितले. तर, दरेकर हे केवळ राजकारणापोटी दोषारोप करत असल्याचे उपनगराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. खासगी रुग्णालये सामान्य नागरिकांची लूट करत असल्याचे निदर्शनाला आल्यावर या खाजगी रुग्णालयांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री या नात्याने दिले. गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात 2006 बेडचे विलगीकरण केंद्र बनवण्यासाठी मुंबईच्या दोन्ही पालकमंत्र्यांनी प्रयत्न केले आहेत. तसेच पश्चिम उपनागरातल्या स्थलांतरित मजुरांना मूळ गावी पाठवण्यासाठीही केंद्र सुरू केले असल्याचे शेख यांनी सांगितले.
दरम्यान, दक्षिण मुंबई मधील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा मुंबईच्या राजकारणात सक्रिय दिसतात. मात्र, कोरोना प्रादुर्भावात त्यांचे दर्शन झाले नसल्याचे दक्षिण मुंबईतल्या नागरिकांनी सांगितलं. तर, धारावीच्या आमदार आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड गेले काही दिवस धारावीत तळ ठोकून होत्या. मात्र त्यांच्यावर ही हिंगोलीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी असल्याने त्याही केवळ मुंबईत थांबू शकत नाहीत. वर्षा गायकवाड यांच्यावर आणि हिंगोलीची जबाबदारी असल्याने माजी खासदार मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड धारावीच्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. तर, स्थानिक कार्यकर्त्यांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर गरजू व्यक्तींना मदत करण्याचा प्रयत्न करत आल्याचे माजी खासदार संजय निरुपम यांनी सांगितले.