मुंबई : संविधान सभेत चर्चा झाल्यानंतर गेल्या 75 वर्षांमध्ये समान नागरी कायद्याबाबत चर्चा झाली नाही. त्यामुळे आता केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या समान नागरी कायद्यासंदर्भात येत्या पावसाळी अधिवेशनात संसदेत चर्चा केली जावी, हा कायदा मांडला जावा, त्याला आम्ही सर्वजण समर्थन देत आहोत अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे संसदीय गट नेते खासदार राहुल शेवाळे यांनी आज मुंबईत दिली. त्यांच्यासोबत खासदार धैर्यशील माने आणि खासदार हेमंत पाटीलसुद्धा पत्रकार परिषदेला उपस्थित होते. तसेच उद्धव ठाकरे यांनी या कायद्यासंदर्भात गैरसमज पसरवू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
समान नागरी कायदा आवश्यक: यावेळी बोलताना राहुल शेवाळे म्हणाले, हा कायदा देशातील सर्व नागरिकांना समान हक्क आणि समान सुरक्षा प्रदान करणारा कायदा असणार आहे. त्यामुळे या कायद्याला सर्व नागरिकांनी आणि सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन समर्थन दिले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या कायद्याबाबत संविधानामध्ये तरतूद केली होती; मात्र काँग्रेसने हिंदू कोड बिल आणून या कायद्याला विरोध केला. या कायद्याबाबत समाजामध्ये गैरसमज पसरवण्यात येत आहेत. माजी खासदार हुसेन दलवाई यांनी या कायद्यासंदर्भात केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे असल्याचेही शेवाळे यावेळी म्हणाले.
मुस्लिम महिलांसाठी दिलासादायक: हा कायदा मुस्लिम महिलांसाठी अतिशय योग्य कायदा असून मुस्लिम वारसा घटस्फोट तसेच लैंगिक शोषण आणि अपत्यांबाबतीत या कायद्याद्वारे मुस्लिम महिलांना योग्य न्याय मिळणार आहे. त्यामुळे मुस्लिम महिला संदर्भात हा कायदा वरदान ठरणार असून त्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे शेवाळे यावेळी म्हणाले.
विधानसभेने ठराव करावा: या कायद्याला सर्व राजकीय पक्षांनी समर्थन देणे गरजेचे आहे. देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा कायदा आहे. त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारनेही विधानसभेमध्ये या कायद्यासंदर्भात ठराव करून या कायद्याला समर्थन करावे, अशी विनंती आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे शेवाळे यांनी सांगितले. राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून हे एक वर्ष यशस्वी ठरले आहे. राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत आणि मुख्य म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील शिवसैनिक मुख्यमंत्रीपदी आहे असेही शेवाळे यावेळी म्हणाले.
सत्ता गेली म्हणून आक्रोश मोर्चा: उद्धव ठाकरे यांनी समान नागरी कायद्याबाबत जनतेमध्ये गैरसमज पसरवू नयेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते समान नागरी कायदा अंमलात यावा. त्यामुळे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठाकरे यांनी सहकार्य करावे, असे आवाहन खासदार शेवाळे यांनी केले. उद्धव ठाकरे गटाने आयोजित केलेला मुंबई महानगरपालिकेवरील जनअक्रोश मोर्चा म्हणजे सत्ता गेल्यानंतरचा आक्रोश असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. आक्रोश मोर्चा म्हणजे गेली अनेक वर्षे पालिकेच्या जीवावर सत्ता भोगल्यानंतर खाल्ल्या मिठाला न जागण्याचा प्रयत्न असल्याचेही खासदार राहुल शेवाळे म्हणाले.