मुंबई: एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेते सरकार वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोराचा गट भाजप सोबत युती करून नवीन सरकार स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहे. या सर्व घडामोडीत राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांची भूमिका महत्त्वाची आहे. शिंदे यांच्या बंडखोरीने राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला आहे. या भूकंपाने राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकलेली आहेत. देवेंद्र फडवणीस या बाबत जपून पावले टाकत आहेत.
फडणवीस यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी? एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने राज्यात राजकीय घडामोडी होत असताना दुसरीकडे देवेंद्र फडणीस यांचे सागर हे निवास्थान सध्या नवीन सत्तास्थापनेचा केंद्रबिंदू बनला आहे. गेल्या सहा दिवसात फडणीस यांच्या दोन दिल्लीवाऱ्या तसेच परवा रात्री व्हाया इंदोर ते बडोदा येथे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची त्यांनी विशेष भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे २०१९ ला १०५ आमदारांचे पाठबळ असून सुद्धा राज्यात सरकार स्थापन न करू शकल्याने हतबल झालेली भाजप आत्ता या नवीन नाट्यमय घडामोडी दरम्यान सत्तास्थापनेसाठी पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे. त्यासाठी दररोज देवेंद्र फडवणीस यांच्या निवास्थानी बैठकांचे सत्र सुरू आहे. केंद्रीय मंत्री, वरिष्ठ नेते, आमदार, खासदार यांच्या भेटीगाठी दररोज फडणीस यांच्यासोबत दिसत आहेत.
सागर निवासस्थानी भाजप नेत्यांची वर्दळ? आजही भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गिरीश महाजन, आमदार आशिष शेलार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देवेंद्र फडणीस यांच्यासोबत चर्चा केली. २०१९ मध्ये शिवसेनेसोबत पुरेसे संख्याबळ असूनही राज्यात सरकार स्थापन करण्यास अपयशी ठरल्याचा ठपका फडवणीस यांच्यावर लागला होता. आता पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटासोबत सरकार स्थापण्याची संधी त्यांच्याकडे चालून आली आहे, या परिस्थितीत ते कशा पद्धतीने हे प्रकरण हाताळतात हे पाहणे फार महत्वाचे ठरणार आहे. आताच झालेल्या राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीत राज्यसभेचे तीन व विधान परिषदेचे पाचही उमेदवार निवडून आणून देवेंद्र फडवणीस यांनी करिश्मा करत महाविकास आघाडी सरकारला झटका दिला आहे.
या पूर्ण नाट्यमय प्रकरणात भाजपचा संबंध? वास्तविक एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मागे भाजपचा काडीचाही संबंध नसल्याची भाषा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करत आहेत. पण ज्या अनुषंगाने सुरत व गुवाहाटी येथे ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे तेथे महाराष्ट्रातील हे बंडखोर आमदार पोहोचलेले आहेत. तसेच केंद्रीय सुरक्षेच्या देखरेखीखाली या बंडखोर आमदारांना ठेवण्यात आलेल आहे. हे सर्व पाहता या पूर्ण प्रकारामागे भाजपचा हात असू शकत नाही असे होणे शक्य नाही. दोन दिवसापूर्वी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये अडीच तास रात्री उशिरा चर्चा झाली. त्या दरम्यान देवेंद्र फडवणीस सुद्धा दिल्लीदरबारी होते अशी माहिती सूत्रांकडून भेटत आहे. म्हणूनच सध्याचे राजकारण बघता देवेंद्र फडणीस या सर्व नाट्यमय घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवत असून या प्रकरणात पडद्यामागून मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय हालचालींना वेग आलेला आहे.
हेही वाचा : Maharashtra Political Crisis: व्यंकय्या नायडूंचा एक निर्णय येणार शिवसेनेच्या मदतीला