मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये तब्बल दोन लाख कोरोनारुग्ण आढळले आहे. त्यामुळे राज्य सरकार चिंतेत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची तयारी करा, अशी सूचना प्रशासनाला दिलेली आहे. त्यावर भाजपाने आक्षेप घेत या लॉकडाऊनला आमचा विरोध आहे, अशी ठाम भूमिका भाजपाने मांडलेली आहे. या सगळ्या प्रकरणावर राज्याचे विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. 'राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणासाठी केंद्र सरकारतची मदत घ्यावी.' अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
यावेळी दरेकर म्हणाले, की केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात अनेक उपाययोजना केल्या आहे. सर्वसामान्यांना मदत केली. त्यामुळे देशपातळीवर केंद्र सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी ठरले आहे. राज्याला मदत केल्यानंतर ही महाविकास आघाडी सरकार नियोजन करण्यात अपयशी ठरले आहे. केंद्राने राज्याला दिलेल्या व्हेंटिलेटरपैकी 400 व्हेंटिलेटर प्रशिक्षित तंत्रज्ञ नाहीत म्हणून धूळखात पडले आहेत. राज्य सरकार जनतेची काळजी घेण्यात अपयशी ठरलेल आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला आणि गृह विभागाला आमची विनंती आहे की त्यांनी राज्यात लक्ष घालावे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करावे. सर्वसामान्य लोकांकडे राज्य सरकारचे लक्ष नाही, सत्ता टिकवणे हाच त्यांचे लक्ष आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लक्ष घालून कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
हेही वाचा-लॉकडाऊन न लावण्याच्या मागणीसाठी काँग्रेस नेते संजय निरुपम यांचे हॉटेल व्यावसायिकांसह आंदोलन