मुंबई - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. त्याचे पडसाद मुंबईत रहाणाऱ्या परप्रांतीय मजूरांमध्ये उमटले. आम्हाला आमच्या गावाला जावू द्या, या मागणीसाठी वांद्रे परिसरात राहणारे मजूर एक एक करत हजारोंच्या संख्येने वांद्रे स्थानकाबाहेर जमले. त्यानंतर या जामावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला. लॉकडाऊनमध्ये काहीतरी सूट मिळेल आणि आपल्याला आपल्या गावी जाता येईल, अशी अपेक्षा मुंबईत काम करणाऱ्या परप्रांतीय मजूरांना होती. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे या मजूरांच्या सयंमाचा बांध तुटला. त्यांनी वांद्रे स्थानकातच ठिय्या देत 'आम्हाला आमच्या गावाला जावू द्या' ही मागणी लावून धरली. पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. शिवाय आवश्यक मदत देण्याचेही आश्वासन दिले. मात्र, जमाव ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे अखेर नाईलाजास्तव पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
वांद्रे परिसरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर राहातात. त्यात विशेषत: बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल इथल्या मजूरांचा समावेश आहे. लॉकडाऊन वाढल्याने हातावर पोट असणाऱ्या या मजूरांच्या अडचणीत आता वाढ होणार आहे.