मुंबई - शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनलॉकला सुरुवात झाल्यापासून मुंबईत अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचे समोर आले आहे. मुंबईमधील लालबाग मार्केटमध्येही खरेदीसाठी गर्दी होत असल्याने हे मार्केट पुढील पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. एफ दक्षिणच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांनी याबद्दलची माहिती दिली.
मुंबईमधील मध्यवर्ती विभाग म्हणून लालबाग प्रसिद्ध आहे. या विभागात मुंबईमधील मराठी माणूस मसाले बनवण्यासाठी येत असतो. तसेच गणेश गल्ली, लालबागचा राजा, तेजुकाय मेंशन आदी सार्वजनिक गणेशोत्सवामुळे या विभागाला वेगळी ओळख निर्माण झाली आहे. याच विभागात लॉकडाऊन शिथील झाल्यावर कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. मागील ४ दिवसात येथे कोरोनाचे ७ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे, लालबाग मार्केट परिसर ५ दिवस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती क्षीरसागर यांनी दिली.
लालबाग मार्केटमधील सर्व दुकाने बुधवारपासून रविवारपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच येथील रहिवाशांनाही घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पालिकेच्या एफ दक्षिण विभागाच्यावतीने बुधवारपासून या परिसरात हेल्थ कॅम्पच्या माध्यमातून स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. लालबाग मार्केट ज्या पालिका विभागाच्या अखत्यारीत येते त्या एफ दक्षिण विभागात ३ हजार ५०२ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर, १ हजार ५९२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.