मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीची निकाल हाती आल्यानंतर या पाच जागांपैकी महाविकास आघाडीने थेट तीन जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले आहेत. विधान परिषदेच्या या निकालामुळे महाविकास आघाडीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अमरावती, औरंगाबाद आणि कोकण या तीन शिक्षक मतदार संघ आणि नाशिक आणि नागपूर असे दोन पदवीधर मतदार संघात ही निवडणूक झाली. यापैकी नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती या मतदारसंघात भाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले आहेत. मात्र या निवडणुकीतही महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव पाहायला मिळाला.
काँग्रेसची नाचक्की : नाशिक मतदारसंघात थेट उमेदवारच चुकल्यामुळे ऐनवेळी काँग्रेसची नाचक्की झाली अंतिम क्षणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अपक्ष उमेदवार असलेल्या शुभांगी पाटील यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित कराव लागलं. तर कोकण मतदार संघात शेकापचे बाळाराम पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र, तिथे त्यांना पराभव पत्करावा लागला. या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला उमेदवारी मिळाली असती तर उमेदवार विजयी झाला असता. असे मत निकालानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. त्यामुळे या मतदारसंघातही उमेदवार देत असताना महाविकास आघाडीमध्ये समन्वय नव्हता का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
पोटनिवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या बैठका : कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात लागलेल्या पोटनिवडणुकांमध्ये देखील महाविकास आघाडी मध्ये समन्वयाचा अभाव पाहायला मिळत आहे. या दोन जागी होत असलेल्या पोटनिवडणुकांसाठी गेल्या काही दिवसापासून तीनही पक्ष आपापसात चर्चा करत आहेत. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा परंपरागत मतदार संघ राहिल्यामुळे हा या मतदारसंघातील पोटनिवडणूक काँग्रेस पक्षात लढवेल यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका आधीपासूनच पाहायला मिळाली. तर मागील विधानसभा निवडणुकीत या जागेवर ठाकरे गटाचा पाठिंबा मिळालेले राहुल कलाटे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. त्यामुळे या पोटनिवडणुकीत ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला यावी यासाठी ठाकरे गटाचे नेते आग्रही होते.
दोन्ही जागा लढवण्यासाठी तयारी : दोन्ही पक्ष या दोन जागेवर आग्रही असताना राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही जागा लढवण्यासाठी तयारी केलेली पाहायला मिळाली. तीनही पक्ष इच्छुक असल्याने बैठकातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कसबा पेठ मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार दिला जाणार असून, पिंपरी चिंचवड मधून राष्ट्रवादी. काँग्रेस उमेदवार देणार आहे. राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी कडून उमेदवारी देण्याबाबत पक्षात चाचपणी देखील सुरू झाली आहे. पण आयात उमेदवाराला उमेदवारी दिली जाणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. पिंपरी चिंचवड मधून सात ते आठ नगरसेवक ही निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे अजित पवार याबाबत कोणता निर्णय घेणार याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष ठेऊन आहेत.
पिंपरी चिंचवडच्या जागेबाबत अद्यापही निर्णय नाही : पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ या दोन मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीत कसबा पेठ मतदार संघ हा काँग्रेसच्या वाट्याला गेला आहे. काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर करणार. मात्र अद्यापही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पिंपरी चिंचवड मतदार संघात रस्सीखेच सुरू होती. या मतदारसंघात ठाकरे गटाने आपला उमेदवार उभा करावा यासाठी जोरदार प्रयत्न झाले. अद्यापही या मतदारसंघात उमेदवार ठरलेला नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते याबाबत बसून अंतिम निर्णय घेणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. पोट निवडणुका महा विकास आघाडी एकजुटीने लढवणार आहे. कारण आमच्या तिनंही पक्षाचा राजकीय शत्रू एकच आहे. शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात महाविकास आघाडी निवडणूक लढवेल. या दोन्ही जागेवर महा विकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
कसबे पेठ मतदारसंघात काँग्रेसकडून तयारी सुरू : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही कसबा पेठ मतदारसंघातून काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचा जाहीर केला आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवत असून काँग्रेसचा उमेदवार या निवडणुकीत विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
समन्वयाच्या अभावाचा फटका महाविकास आघाडीला : महाविकास आघाडी म्हणून आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये बहुतांश वेळा महाविकास आघाडीत समन्वयाचा अभावाचा फटका पाहायला मिळाला. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाने आपल्या पक्षात आणि इतर दोन पक्षासोबत व्यवस्थित समन्वय ठेवल्यास त्याचा फायदा निवडणुकांमध्ये त्यांना नक्कीच होऊ शकतो. नाशिक पदवीधर मतदार संघात पक्षातच असलेल्या मतभेदामुळे काँग्रेसला फटका बसला. तसेच होऊ घातलेल्या पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये असलेल्या तीनही पक्षात अनेक इच्छुक असल्याने त्याचा फटका हा विकास आघाडीला बसू शकतो. त्यामुळे तिन्ही पक्षाने आपल्या पक्षांतर्गत आणि इतर दोन पक्षासोबत समन्वय ठेवला पाहिजे असं मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - Jitendra Awhad tweet On Ramayana: रावण काढून रामायणातला राम समजावून सांगा; आव्हाडांचे नवे ट्विट