मुंबई - माझगाव येथील जीएसटी भवनला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली होती. यावेळी एका तरुणाच्या देशप्रेमाचे दर्शन झाले. इमारतीला आग लागलेली असताना इमारतीवरील तिरंगा जळू नये यासाठी या तरुणाने आपला जीव धोक्यात घालून इमारतीवरील तिरंगा उतरवला आहे. कुणाल जाधव असे या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा - जीएसटी भवन आग: 'मुख्यंत्र्यांकडे चौकशी समितीची मागणी करणार'
माझगाव येथे विक्रीकर भवन आहे. काही वर्षांपूर्वी ते वॅट भवन तर आता जीएसटी भवन म्हणून ओळखले जाते. तळ अधिक नऊ मजली असलेल्या इमारतीच्या नवव्या मजल्यावर आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान आग लागली. आग लागली त्यावेळी इमारतीमधील फायर अलार्म वाजला. त्यावेळी आग लागल्याचे कळताच सर्व जण इमारतीमधून खाली उतरले. इमारतीच्या वरच्या मजल्यावर आगीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या. इमारतीचा परिसर काळ्याकुट्ट धुराने वेढला होता. अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते.
जीएसटी भवनला आग लागल्याने या इमारतीमध्ये असलेल्या सुमारे 3 हजार 500 कर्मचारी अधिकाऱ्यांची जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू होती. त्याच वेळी आगीच्या ज्वाला इमारतीच्या छतावर असलेल्या भारताचा तिरंगा ध्वजाच्या जवळपास पोहोचू लागल्या होत्या. आपल्या देशाचा तिरंगा ध्वज थोड्याच वेळात जळून जाईल, असे दिसताच याच कार्यालयात काम करणाऱ्या कुणाल जाधव या कर्मचाऱ्याने आपल्या साथीदारांसोबत इमारतीचे छत गाठले. त्याठिकाणी आगीच्या ज्वालांचा सामना करत या तरुणाने भारताचा तिरंगा ध्वज आगीत जळून खाक होण्यापासून वाचवला.
हेही वाचा - हिंमत असेल तर लोकसभेची फेर निवडणूक घ्या, फडणवीसांना प्रति आव्हान