मुंबई - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपींपैकी एक रोना विल्सन यांच्या लॅपटॉपमधील धमकी देणारी पत्र हे सायबर हल्लेखोरांकडून ठेवण्यात आल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयामध्ये करण्यात आला आहे. अमेरिकेतील आर्सेनल कन्सल्टिंग या संस्थेच्या अहवालानुसार हा दावा करण्यात आला.
रोना विल्सन यांचे वकील पासबोला यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये आर्सेनल कन्सल्टिंग या संस्थेचा अहवाल सादर करण्यात आला. तब्बल 22 महिने रोना विल्सन यांच्या लॅपटॉपवर सायबर हल्ला करण्यात आलेला होता. एका विशिष्ट मालवेअरकडून त्यांच्या लॅपटॉपचा ताबा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारून सत्ता पालट करण्याचा मजकूर असलेली 10 पत्र त्यात ठेवण्यात आल्याचे या अहवालात सांगितले आहे.
हा प्रकार गंभीर: आर्सेनल कन्सल्टींग
रोना विल्सन यांच्या जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपची इलेक्ट्रॉनिक कॉपी अमेरिकेच्या वॉशिंग्टन येथील 'आर्सेनल कन्सल्टिंग'ला पाठवण्यात आली होती. सायबर हल्लेखोरांकडून झालेल्या हल्ल्यात रोना विल्सन यांच्या लॅपटॉपचा ताबा मिळवण्यात आला होता. हल्लेखोरांनी त्यामध्ये दहा धमकी देणारी पत्र ठेवली होती. जगभरात असे प्रकार घडत असून रोना विल्सनच्या बाबतीत घडलेला प्रकार हा फारच गंभीर असल्याचे या अहवालात मांडण्यात आले आहे.
कोण आहेत रोना विल्सन -
रोना विल्सन हे जेएनयूचे माजी विद्यार्थी असून ते दिल्लीत राहतात. राजकीय कैद्यांच्या सुटकेसाठी ते काम करतात. गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रातील सर्वांत सक्रिय कार्यकर्त्यांपैकी ते एक होते. कमिटी फॉर रिलीज ऑफ पॉलिटिकल प्रिझनर्स (सीआरपीपी) या संघटनेचे ते सदस्य आहेत. कोरेगाव भीमाचा हिंसाचार झाल्यानंतर त्यांना अटक करून त्यांच्या लॅपटॉप जप्त करण्यात आला होता.
दरम्यान कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांकडून गौतम नवलखा, वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा , रोना विल्सन सह पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे.