मुंबई - वरळीच्या कोळीवड्यात 10 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामधील एकाचा काल रात्री कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मृत व्यक्ती हा कोळी समाजाचा नेता असून त्यांनी कोस्टल रोड प्रकल्प आणि सीआरझेडला विरोध केला होता.
वरळीच्या कोळीवाडा परिसरात एकाच वेळी कोरोनाचे 10 रुग्ण दोन ते तीन दिवसांपूर्वी आढळून आले होते. त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हा विभाग सील करण्यात आला आहे. येथील नागरिक विभागातून बाहेर आले तर कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, याची भीती असल्याने तेथील नागरिकांना अत्यावश्यक वस्तू पालिकेकडून आणि संस्थांकडून पुरवल्या जात आहेत. या विभागात गर्दी होऊ नये, म्हणून पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे.
दरम्यान वरळी कोळीवाड्यातील कस्तुरबामध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी सीआरझेड आणि कोस्टल रोड प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नेत्याचा काल रात्री उशिरा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. कोस्टल रोड प्रकल्प झाल्यास कोळी समाजातील लोकांचा व्यवसाय बंद होऊन उपासमारीची वेळ येईल त्यामुळे येथील नागरिकांनी कोस्टल रोडला विरोध केला आहे. या कोळी समाजाच्या नेत्याची पत्नी आणि मुलगा सुद्धा कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. दरम्यान या मृत्यूबाबत पालिकेने किंवा सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.