मुंबई - कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष समिती येत्या १७ मार्चला महाविजयोत्सव साजरा करणार आहे. या महाविजयोत्सवातच समिती आपली राजकीय भूमिकाही जाहीर करणार आहे.
शिवसेना-भाजप युतीच्या घोषणेवेळी नाणार प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प रद्द झाल्याचा अध्यादेश काढून तो मंजूर केला. अखेर दोन वर्षांच्या अथक संघर्षानंतर प्रस्तावित नाणारवासियांचा विजय झाला. भूसंपादानाचा अध्यादेश आणि रिफायनरी दोन्हींही नाणारमधून हद्दपार झाले.
या संघर्षाच्या वाटचालीत काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमान व मनसे या पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. या सर्व राजकिय पक्ष प्रमुखांची नाणार विरोधी प्रकल्प समितीने भेट घेतली असून या महाविजयोत्सवाला हजर राहण्यासाठी आमंत्रण दिले आहे. त्यामुळे येत्या १७ तारखेला नाणारच्या विजयमहोत्सवाला कोण-कोण नेते हजर राहतील आणि नाणार विरोधी प्रकल्प समितीची राजकीय भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.