मुंबई - गेल्या पाच वर्षात खासदार म्हणून विकास कामांकरीता मिळणारा १०० टक्के निधी खर्च करून नागरिकांना सोयी सुविधा देण्याचे काम मी केले आहे. शंभर टक्के खासदार निधी खर्च करणारे भारतात पाचच खासदार आहेत. त्यापैकी मी एक असल्याची माहिती ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांनी दिली. ईशान्य मुंबई मतदार संघातील विकास कामाच्या आढाव्याबाबत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीनी सोमय्या यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी खासदार निधीचा कोणकोणत्या विकास कामासाठी वापर करण्यात आला याची सविस्तर माहिती सांगितली.
१६ व्या लोकसभा निवडणुकीत मुंबईमधील ईशान्य मुंबई म्हणजेच उत्तर पूर्व मुंबईमधून ५ लाखाहून अधिक मते मिळवून किरीट सोमय्या खासदार म्हणून निवडून आले होते. २०१४ पासून २०१९ या पाच वर्षाच्या कार्यकाळात सोमय्या यांना २५ कोटींचा निधी तर या निधीवर ६१ लाखांचे व्याज प्राप्त झाले. हा सर्व निधी आपला पाच वर्षाचा कार्यकाळ संपण्याआधीच खर्च केल्याचे सोमय्या यांनी सांगितले. विजेची बचत व्हावी म्हणून आपल्याला मिळालेल्या खासदार निधीमधून मतदार संघामधील महाविद्यालयांमध्ये (कॉलेज) सोलर सिस्टम लावून दिली. मुंबईत शौचालयाची मोठी अडचण आहे. ही अडचण दूर करण्यासाठी २०० वस्त्यांमध्ये सार्वजनिक शौचालय बांधून दिली. १२७ शाळांमध्ये ६३५ संगणक बसवून दिले. रेल्वे प्रवाशांना सुविधा मिळावी म्हणून बसण्यासाठी बाकडी, पिण्याचे पाणी, शौचालय, कचरा कुंडी, एलईडी इंडिकेटर, व्यायामशाळा, समाजकल्याण केंद्र, महिला बचत गट आदीसाठी खासदार निधीचा वापर केल्याचेही सोमय्या यांनी यावेळी सांगितले.
रोजगार मेळावे, वैद्यकीय शिबिरे -
खासदार म्हणून काम करताना प्रत्येक शनिवारी "पब्लिक डे" आयोजित केला. त्यात सुमारे २५ हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला. ईशान्य मुंबईमधील बेरोजगारांसाठी १२ रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले. तब्बल २७ हजार ४०० जणांनीत्याचा लाभ घेतला. महानगरच्या पाईपलाईन गॅसची ४० हजार लोकांना जोडणी करून दिली. उपनगरीय रेल्वे प्रवासी संपर्क अभियानातंर्गत प्रवाशांशी संवाद साधून प्रवाशांचे प्रश्न मार्गी लावले. प्रत्येक रविवारी वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले त्याचा ३० हजार लोकांनी याचा लाभ घेतल्याचे सोमय्या यांनी संगीतले.
संसदेतील कामगिरी -
संसदेच्या विविध १२ समित्यांमध्ये कार्यरत असून ९७ बैठकांना हजेरी लावली. संसदीय समितीच्या विविध १२ अभ्यास दौऱ्यांना उपस्थिती लावली. जिनिव्हा येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत सरकारचे प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतल्याचे सोमय्या यांनी सांगितले.