मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी व भाजपने केली होती. त्यानुसार आज न्यायालयाने निकाल देत सीबीआयकडे तपास सोपवावा, असे निर्देश सरकारला दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने धडा घ्यावा तसेच गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच सर्व पुरावे सीबीआयला देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले. याप्रकरणी किरीट सोमय्या म्हणले, आज न्यायालयाने सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता सुशांतला न्याय मिळेल. मुंबई पोलीस आयुक्तांनी गेले दोन महिने काय केलं त्याचं स्पष्टीकरण द्यावं. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही सोमय्या यांनी केली. तसेच महाराष्ट्र सरकार यातून आतातरी धडा घेणार आणि आता सुशांत सिंह राजपूतच्या परिवाराला अखेर न्याय मिळेल, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रिया चक्रवर्तीच्या विरोधात पाटण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात रियाने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. याच प्रकरणावर आज सुनावणी होती.