मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. परंतु याचिका दाखल करण्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर २ हजार कोटींचा व्यवहार झाल्याचा काल आरोप केला होता. त्याचा उल्लेख या अपिलामध्ये केलेला नसल्याने याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून या प्रकरणावर लक्ष वेधले आहे. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर योग्य ती कारवाई करण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे.
सोमैया यांचे निवडणूक आयोगाला पत्र : खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेल्या निर्णयाबद्दल बोलताना यामध्ये २ हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे व संजय राऊत हा दावा कोर्टाच्या अपिलात करणार का? असा प्रश्न कालच किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला होता. आज ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात अपील दाखल करत असताना या मुद्द्याचा विचार न केल्याने किरीट सोमय्या यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून यावर योग्य ती कारवाई करण्याची विनंती सोमय्या यांनी केली आहे.
राऊतांच्या आरोपाचा उल्लेख नाही: खासदार संजय राऊत यांनी काल बोलताना शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यासाठी २ हजार कोटींचा सौदा झाल्याचा आरोप केला होता. संजय राऊत यांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी संजय राऊत यांना आव्हान दिले होते. न्यायालयात अपील करताना हा आरोप उद्धव ठाकरे व संजय राऊत करणार आहेत का? असा प्रश्न त्यांनी काल उपस्थित केला होता. आज ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली. मात्र सर्वोच्च न्यायालयात अपील करताना २ हजार कोटीच्या व्यवहाराचा मुद्दा उपस्थित न केल्याने या निर्णयाविरोधात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
काय म्हटले आहे पत्रात : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमैय्या यांनी सांगितले आहे की, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर टिप्पणीकडे मी आपले लक्ष वेधण्याची विनंती करतो. राऊत यांनी प्रसारमाध्यांसोबत बोलताना सांगितले होते की, हा निर्णय देताना याच्यामध्ये २ हजार कोटींचा घोटाळा झाला असून या पद्धतीचा व्यवहार झाला आहे. अशा आरोपांचा मी तीव्र निषेध करत असून मी निवडणूक आयोगाला याबाबत योग्य ती कारवाई करण्याची विनंती करत आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्राची निवडणूक आयोग कशा पद्धतीने दखल घेते, हे बघणे सुद्धा गरजेचे आहे.
काय म्हणाले होते, संजय राऊत : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा हादरला बसला आहे. व यातून सावरण्यासाठी त्यांना आता बराच अवधी जाणार आहे. परंतु या दरम्यान आरोप - प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. निवडणूक आयोगाने हा निर्णय देताना पक्षपातीपणा केल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत २ हजार कोटी रुपयांचा सौदा आणि व्यवहार झाले असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. इतकेच नाही तर याबाबत माझी खात्रीची माहिती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच हा प्राथमिक आकडा असून हे शंभर टक्के सत्य असल्याचेही ते म्हणाले आहेत. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील, देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असेही राऊत यांनी सांगितले आहे.