मुंबई - जालना मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी शिवसेना नेते अर्जून खोतकर आग्रही आहेत. ही जागा भाजपच्या वाटेला आली आहे. त्यामुळे युतीपुढे पेच निर्माण झाला आहे. आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि खोतकर यांच्यामध्ये चर्चा झाली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली आहे. खोतकर या जागेवरुन लढण्यावर अजूनही ठाम आहेत.
मातोश्रीवर उध्दव ठाकरे, अर्जून खोतकर आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये चर्चा झाली. यात जालन्यातील जागेवर तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. जालन्यातून रावसाहेब दानवे हे युतीचे उमेदवार आहेत. त्यामुळे खोतकर यांनी माघार घ्यावी यासाठी युतीच्या नेत्यांचे प्रयत्न आहेत. पण, खोतकर त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचे समजते.
ही जागा शिवसेनेला सोडली, तर शिवसेना सहज जिंकेल. ही लढत मैत्रीपूर्ण होईल असे खोतकर म्हणाले. आपण त्या जागेसाठी आग्रही असल्याचा पुनरुच्चारही खोतकरांनी केला. उद्या औरंगाबादमध्ये युतीची सभा होणार आहे. तिथे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तेव्हा उद्याच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे जालन्याच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.