मुंबई Khichdi Scam Case : कोरोनाकाळात स्थलांतरितांना देण्यात आलेल्या कथित खिचडी वाटपात घोटाळा झाल्याच्या आरोपाप्रकरणी ईडीनं मुंबई महापालिकेच्या उपायुक्त संगीता हन्साळे यांना 26 ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे समन्स जारी केलं. परंतु, कार्यालयीन कामामध्ये व्यस्त असल्यानं त्यांना सोमवारी हजर राहण्यास सांगण्यात आलं होत. आज (30 ऑक्टोबर) हन्साळे यांची ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे.
ईडीची सात ठिकाणी छापेमारी : कोरोनाकाळात गरिबांना तसंच स्थलांतरितांना खिचडी वाटपाचं महापालिकेकडून खासगी कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं होतं. मात्र, या कंपन्यांनी राजकीय नेत्यांशी संगनमत करून खिचडीची वाढीव दराची बिलं पालिकेला दिल्याचा ईडीचा आरोप आहे. या प्रकरणात 18 ऑक्टोबर रोजी संगीता हन्साळे यांच्या निवासस्थानासह एकूण सात ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. कोरोनाकाळात महापालिकेत झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी यापूर्वी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्याच्या आधारे ईडीनं मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली.
12 पेक्षा अधिक कंत्राटदार बोगस : 132 कोटी रुपयांच्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊतांचा मुलगा, मुलगी, भागीदार आणि अमोल कीर्तिकर यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केलाय. खिचडी वाटपाचं कंत्राट 50 कंत्राटदारांना महानगरपालिकेतर्फे देण्यात आलं होतं. यापैकी 12 पेक्षा अधिक कंत्राटदार बोगस असल्याचं निष्पन्न झालं.
सूरज चव्हाण यांचाही समावेश : या खिचडी वाटप घोटाळ्यामध्ये आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांचाही समावेश असल्याचा दावा किरीट सोमैय्या यांनी केला. 50 कंत्राटदारांना 132 कोटी 89 लाख रुपये वितरित केल्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावाही भाजपा नेते सोमैय्या यांनी केला. सोमैय्या यांच्या दाव्यानुसार राजीव साळुंखे या केईएम रुग्णालयासमोर रिफ्रेशमेंट चालवणाऱ्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये दहा कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. सह्याद्री रिफ्रेशमेंट या नावाने वैश्य सहकारी बँकेत हे खाते असून या खात्यामध्ये खिचडी वाटपाचे पैसे वर्ग करण्यात आले, असं सोमैय्या यांनी म्हटले होते. सुरज चव्हाण यांच्यासह गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांची खिचडी घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती.
हेही वाचा -