मुंबई - १६ एप्रिल २०२३ रोजी खारघर (Maharashtra Bhushan Award) येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने १४ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आज विधान परिषदेत काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर वादग्रस्त चर्चा झाली. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी या प्रकरणी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. या प्रश्नाला सविस्तर उत्तर देताना मंत्री मुनगंटीवार यांनी यामध्ये सरकारचा कुठलाही दोष नसल्याचे स्पष्ट करत या वादावर पडदा टाकला.
उष्माघाताने १४ जणांचा मृत्यू - १६ एप्रिल २०२३ रोजी खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने १४ जणांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. याबात आज विधान परिषदेत काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला.
ही घटना घडली त्यावर निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी व्हावी, पण ती काही केली नाही. तसेच यावेळी मृत्यू पडलेल्या श्री सदस्यांच्या घरी शासनाचे प्रतिनिधी गेले का नाहीत? कार्यक्रमादरम्यान मंत्रीमहोदय, खासदार, आमदार हे एसीमध्ये आणि लाखो श्री सदस्य उन्हातान्हात बसले होते, या कार्यक्रमावर ३३ कोटी खर्च झाला, त्या कंत्राटदाराची माहिती देणार का? - भाई जगताप, काँग्रेस आमदार
पुरस्कारावर १५ कोटी खर्च - या मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, हा शासनाचा पुरस्कार होता की खासगी कार्यक्रम हे अजून समजले नाही. या कार्यक्रमाबाबत श्री सदस्य कुठलीही तक्रार करत नाहीत अशी त्यांना शिकवण दिली आहे. म्हणून त्यांनी कुठलीही तक्रार करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. परंतु, सरकार म्हणून आपली काही जिम्मेदारी आहे की नाही? हा पुरस्कार २५ लाखाचा होता तर या पुरस्कारावर १५ कोटी खर्च करण्यात आले, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला आहे.
चौकशी कोणी करावी - विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर देताना, ही दुर्दैवी घटना असल्याचे सांगत ही घटना नैसर्गिक आपत्ती आणि आपत्तीजनक होती. तसेच अशा प्रकरणात सेवानिवृत्त न्यायमूर्ती चौकशीची काय परंपरा आहे, याची विस्तृत माहिती मुनगंटीवार यांनी दिली. ते म्हणाले, अशा अनेक घटना याआधी झाल्यात. नगरमध्ये ११ रुग्णांचा मृत्यू झाला, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यावेळेस चौकशी झाली नाही. नाशिकमधील झाकिर रुग्णालय ऑक्सिजन टँक लिकेज होऊन रुग्णांचा मृत्यू झाला, त्याची चौकशी नाही, असे सांगत राजीनामा देण्याचा प्रश्नच नसल्याचे म्हटले आहे.
कंत्राट, कन्सेप्ट कम्युनिकेशन लिमिटेडला - पुढे मुनगंटीवार म्हणाले की, या कार्यक्रमाला श्री सदस्य लाखोंमध्ये आले होते. त्या सदस्यांनी आक्षेप घेतला नाही. ही घटना दुर्दैवी होती, वेदनादायक आहे. मृत झालेल्या श्री सदस्यांच्या कुटुबाची भेट घेतली. त्यांनी कोणता आक्षेप घेतला नाही, लाखो सदस्य येणार असल्यामुळे ३०६ एकर जागेत व्हेंटिलेशनमुळे मंडप टाकता येणार नसल्याने मंडप टाकला नाही. जर हा कार्यक्रम संध्याकाळी केल्यास भरदुपारी येऊन लाखो श्री सदस्य येऊन उन्हातान्हात बसतील असे बोलले गेले. एका मोठ्या नेत्याने चेंगराचेंगरीचा व्हिडिओ टाकला. तो युट्यूबवरून काढलेला होता. हा व्हिडिओ या घटनेचा नव्हता, हे सिद्ध झाले आहे. या दुर्दैवी घटनेचे राजकारण केले. या कार्यक्रमात ३३ कोटी खर्च झाले का, या उत्तराला एवढा खर्च झाला नाही, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच हे कंत्राट कॉन्ट्रॅक्ट कन्सेप्ट कम्युनिकेशन लिमिटेडला दिले असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगत एकूण या वादावर पडदा टाकला.
हेही वाचा -