मुंबई - ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची मॅनेजर करिष्मा प्रकाश हिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) चौकशीला सामोरे जाण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार करिष्मा प्रकाश ही बुधवारी एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहे.
करिष्मा प्रकाशच्या घरी काही दिवसांपूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकला होता. त्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ मिळाला असल्याचा दावा एनसीबीने केला होता. त्यानंतर करिष्मा प्रकाश बेपत्ता होती. मात्र मंगळवारी करिष्मा प्रकाशच्या वकिलांकडून मुंबईतील न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. न्यायालयाने या अर्जावरील सुनावणी दरम्यान करिष्मा प्रकाश हिला 7 नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश एनसीबीला दिले. मात्र त्याचबरोबर करिष्माला एनसीबी चौकशीला सामोरे जावे लागेल, असे सुद्धा न्यायालयाने स्पष्ट केले होते.
एनसीबीच्या छाप्यात सापडले अमली पदार्थ!
करिश्मा प्रकाशच्या घरातून अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. मात्र करिष्मा प्रकाश ही सध्या बेपत्ता असून तिचा जबाब नोंदविण्यासाठी एनसीबीकडून करिष्मा प्रकाशला समन्स बजावण्यात आले आहेत. मात्र अद्यापही करिष्मा प्रकाश कुठे आहे, याचा पत्ता लागलेला नाही. करिष्मा प्रकाश घरात उपस्थित नसताना एनसीबीकडून टाकण्यात आलेला छापा हा कायद्याच्या विरोधात असल्याचे तिच्या वकिलांचे म्हणणे आहे. एखादी व्यक्ती तिच्या घरामध्ये हजर नसेल तर तिच्या घरातून अमली पदार्थ नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला कसे काय मिळाले ? असा सवालही करिष्माच्या वकिलांनी केला आहे. करिष्मा प्रकाश हिला अगोदरही तीन वेळा एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यावेळी करिष्माने चौकशीत सर्व प्रकारे सहकार्य केले होते, असा दावाही तिच्या वकिलांनी केला आहे.